डंपर चालकासह तिघे गंभीर जखमी
सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपास वर मळगाव ब्रिजच्या वरील भागात उभ्या असलेल्या पणजी येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्लीपर कोच लक्झरी बसला मागाहून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरचालक केबिनमध्ये अडकून पडला तर बसच्या खाली काम करीत असलेला बस चालक व अन्य एक प्रवास असे दोघेजण गंभीर जखमी झाले. या तिघांनाही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा पणजी येथून मुंबईच्या दिशेने जाणारी नॅशनल ट्रॅव्हल्सची स्लीपर कोच बस (जीए ०७ एफ ८९९७) ही बस मुंबईच्या दिशेने जात होती. झाराप पत्रादेवी बायपास वर मळगाव ब्रिजच्या वर आली असताना गाडीत बिघाड झाल्याने गाडीचा पर्यायी चालक व क्लीनर गाडीखाली उतरले. गाडीच्या मागील भागात जाऊन ते पाहणी करत असताना पाठीमागून कुडाळच्या दिशेने वेगात जाणाऱ्या डंपर (जीए ०४ टी ४४८८) ने उभ्या बसला जोरदार धडक दिली.
या अपघातात बस खाली पाहणी करणारे चालक बाबुराव चव्हाण (५२) व क्लिनर अमीर खान (३०, दोघेही रा. गोवा) यांना गंभीर दुखापत झाली. तर डंपर चालक आनंद तारी (५० रा. कुडाळ) हा डंपरच्या केबिनमध्ये अडकून पडला. त्याच्या दोन्ही पायांना गंभीररित्या दुखापत झाली होती.
या अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्यांनी जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर यातील बस चालक बाबुराव चव्हाण व डंपर चालक आनंद तारी या दोघांना गोवा बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ तसेच बसमधील प्रवासी व अन्य वाहन चालकांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी तसेच डंपरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी मोठे सहकार्य केले.
याबाबतची खबर बसचा मुख्य चालक सुधाकर लक्ष्मण मोरे (५०, ऐरोली नाका चिंचपाडा, नवी मुंबई) यांनी सावंतवाडी पोलिसात केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.














