अनेकांचे धाबे दणाणले
सावंतवाडी : येथील बहुचर्चित ‘करोडपती महासागरा’तील कोट्यवधी रुपयांच्या देवाण-घेवाणीच्या प्रकरणाला आता गोवा कनेक्शन मिळालं आहे. या प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींच्या शोधासाठी सावंतवाडी पोलिसांचं एक विशेष पथक गोव्यात रवाना झालं आहे. दरम्यान, यापूर्वी अटक केलेल्या नऊ आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सावंतवाडी पोलिसांच्या तपासाची चक्रे आता गोव्याच्या दिशेने फिरल्याने या प्रकरणाशी संबंधित अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘करोडपती’ प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. यातील काही मुख्य आरोपी फरार असून, त्यांचा गोवा राज्यात ठावठिकाणा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याच माहितीच्या आधारावर, पोलीस पथक गोव्यात रवाना झाले आहे. या पथकाच्या माध्यमातून फरार आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात वापरलेली कार देखील लवकरच जप्त केली जाईल. तपासामध्ये मिळालेल्या नवीन माहितीच्या आधारे आता अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोवा कनेक्शन उघड झाल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीमुळे बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांशी संबंधित असलेल्या अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Subscribe










