शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परबांच्या उपस्थितीत अजय गोंदावळे सेनेत प्रवेश
सावंतवाडी : शहरातील भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी अखेर भाजपची साथ सोडत शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली काही क्षणांतच त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
गोंदावळे यांच्यासोबत शहरातील अनेक बूथप्रमुख आणि कार्यकर्ते देखील भाजपचा झेंडा खाली ठेवून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सावंतवाडीत भाजपच्या संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच दिवाळीच्या कार्यक्रमात अजय गोंदावळे भाजपच्या व्यासपीठावर होते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेनेच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी या प्रवेशामुळे पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे भाजपमध्ये मात्र या घडामोडीमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, येणाऱ्या स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का ठरू शकतो.