वीजेचा खांब कारवार कोसळला
मालवण : देवबाग येथून मालवणच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी गाडीने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली-सुतारवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबास जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत वीज खांब तुटून गादीवर कोसळल्याने मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने गाडीतील चारही पर्यटक थोडक्यात बचावले. या अपघातामुळे वीज तारा तुटून वीज वितरण कंपनीचे नुकसान झाले असून परिसरात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी- मुंबईहून मालवणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची चारचाकी गाडी देवबाग येथून मालवणच्या दिशेने जात असताना तारकर्ली-सुतारवाडी येथील साई मंदिर मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबास धडकली. गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला येऊन वीज खांबास धडकल्याने चालकाचे नियंत्रण सुटले असावे, अशी चर्चा घटनास्थळी होती.
या जोरदार धडकेत वीज खांब तुटून गाडीच्या दर्शनी भागावर कोसळला. यामुळे गाडीची पुढील काच फुटून दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गाडीतील चारही पर्यटकांना बाहेर काढले.
चारचाकीच्या धडकेत वीज खांब कोसळून वीज वाहिन्याही तुटल्याने महावितरणचे नुकसान झाले आणि त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वीज कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वीज खांब हटवण्यात आला आणि टोचन वाहनाच्या मदतीने गाडी रस्त्यावरून बाजूला करण्यात आली.
या दरम्यान तारकर्ली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिकांनी अथक प्रयत्न करून ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत केली.














 
	

 Subscribe
Subscribe









