तिलारीत पुलाखाली सापडली रक्ताने माखलेली चारचाकी!

घातपात की अपघात?

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तिलारी कोनाळकट्टा येथे मुख्य धरणाच्या पुच्छ कालव्यावरील पुलाजवळ गुरुवारी सकाळी एक अत्यंत संशयास्पद अवस्थेत कार आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही चारचाकी गाडी पूर्णपणे रक्ताने माखलेली असून, तिची नंबर प्लेट गायब असल्याने या घटनेमागे घातपाताचा संशय बळावला आहे.

नेमकं काय घडलं?

आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना पुलाजवळ खोल दरीसदृश जागी, चिखलात अर्धवट अडकलेल्या स्थितीत एक गाडी झाडीत दिसली. जवळ जाऊन पाहिल्यावर गाडीच्या आतील भागात आणि आसपास मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग आढळले. हे दृश्य पाहून ग्रामस्थांना धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ दोडामार्ग पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

घातपाताचा संशय

माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहनाचा पंचनामा करून तांत्रिक तपास सुरू केला आहे. गाडीची नंबर प्लेट नसल्याने वाहन कोणाचे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच गाडीत कोणतीही व्यक्ती किंवा मृतदेह आढळून आला नाही. मात्र, रक्ताचे प्रमाण आणि गाडीची स्थिती पाहता हा साध्या अपघाताचा प्रकार नसावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे, ज्यामुळे घातपाताचा संशय अधिक बळकट झाला आहे.

कोडे कायम

घटनास्थळ हे पुलाजवळ खोल दरीसदृश असल्याने, वाहन त्या ठिकाणी कसे पोहोचले, हेही एक मोठे कोडे बनले आहे. काही ग्रामस्थांनी मध्यरात्रीच्या सुमारास जोराचा आवाज ऐकल्याचे सांगितले आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. तथापि, गाडीला लागलेले रक्त, वाहनाची संशयास्पद स्थिती आणि नंबर प्लेटचा अभाव या सर्व बाबी घातपाताच्या दिशेने अधिक बोट दाखवत आहेत.

या रहस्यमय घटनेमुळे तिराळी परिसरात सध्या उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या घटनेचा तातडीने उलगडा करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!