११ जणांवर गुन्हा दाखल, १ फरार
सावंतवाडीत दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्याचा वाद
सावंतवाडी : येथील शेअर मार्केट “इन्वेस्टर” सागर कारिवडेकर यांच्याकडे गुंतवण्यात आलेले साडेचार कोटी बुडविण्याच्या वादातून एकमेकांना मारहाण केल्याप्रकरणी, अपहरण व जीवे ठार मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यातील ५ जणांसह सावंतवाडीतील ६ जण मिळून ११ जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील ८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
शंभूराज देवकाते, शौनक सकपाळ, बॉबी काकडे, अतुल धीवरे, श्रीकांत कांबळे पाच ही (रा. पुणे) यांच्यासह बांदा येथील तहा राजगुरू, अब्दुल खान, तहसील दरवाजकर, तलाह खान (सर्व रा. बांदा) वामन उर्फ नितीन मेस्त्री (रा. झिरंगवाडी) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तलाह हा फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबतची तक्रार शौनक सकपाळ (रा. पुणे) यांनी सावंतवाडी पोलिसात दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जुलै महिन्यात आपल्यासह मित्र शंभूराज, बॉबी, अतुल, श्रीकांत या पाचही जणांनी मिळून शेअर मार्केटमध्ये पैसे इन्वेस्ट करण्यासाठी सागर कारिवडेकरकडे आपण ४ कोटी ७५ लाख रुपये दिले होते. त्या बदल्यात आपल्याला काही रक्कम कमिशन म्हणून देण्याचे ठरले मात्र त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्याने आपल्याला गुंतवणुकीचे कमिशन सोडा एक रुपया सुद्धा दिला नाही तर त्याचा फोन वारंवार बंद होता. त्याचा संपर्क होत नव्हता.
त्यानंतर त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपण व्यवसायात लॉस झालो आहोत. त्यामुळे तुम्ही माझी पोर्शे कार सावंतवाडी येवून घेऊन जा, असे त्यांनी सांगितले.
त्यानुसार त्याचा संपर्क होत नसल्यामुळे आम्ही त्याच्या सुपरवायझर नितीन मेस्त्री याला फोन लावला. यावेळी तुम्ही गाडी नेण्यासाठी सर्वोदयनगर मधील घरी या, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही सावंतवाडीत येऊन एका हॉटेलमध्ये राहिलो आणि दुसऱ्या दिवशी उठून नितीन याला भेटण्यासाठी गेलो. यावेळी माझ्याकडे गाडीच्या चाव्या नाहीत, त्यामुळे माजगाव- मेटवाडा येथील अविघ्न कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या फ्लॅटचा दरवाजा तोडून आपल्याला चाव्या घ्याव्या लागतील, असे सांगून सावंत यांनी आपल्याला त्या ठिकाणी नेले व फ्लॅटचा दरवाजा तोडण्यास सांगितला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या दोन्ही फ्लॅटचे दरवाजे तोडले परंतु फ्लॅटमध्ये कोणतेही सामान आढळून आले नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा सावंत याला विचारणा केली. यावेळी सर्वोदयनगरमधील बंगल्यावर जाऊया. त्या ठिकाणी चाव्या असतील, असे सांगून त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी नेले. मात्र त्या ठिकाणचे सुद्धा कार्यालय त्याने फोडण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही ते कार्यालय फोडले. चावी मिळाली नसल्यामुळे आम्ही जॅकच्या सहाय्याने पोर्शे कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चावी नसल्यामुळे आमचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. दरम्यान त्याच वेळी त्याने काही गुंडांना फोन करून बोलावले आणि तुम्ही पैसे मागण्यासाठी आला आहात इकडून निघून जावा अन्यथा तुम्हाला जीवे ठार करू, अशी धमकी देऊन आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आपण गाडीत बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या स्विफ्ट कारने आमचा कुडाळपर्यंत पाठलाग केला. पुन्हा आम्ही त्याच स्पीडमध्ये सावंतवाडीत आलो. यावेळी सर्वोदयनगर परिसरात पुन्हा त्यांच्याकडून आपल्याला मारहाण करण्यात आली. तसेच स्वीफ्ट कारमध्ये असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने आपल्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यात आपण सुदैवाने बचावलो. मात्र झालेल्या या मारहाणीत आपला मित्र काकडे व आपण स्वतः जखमी झालो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार सावंत याच्यासह पाचही जणांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी तक्रार नितीन मेस्त्री यांनी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपण सागर कारिवडेकर यांच्याकडे सुपरवायझर म्हणून काम करतो. सागर कारिवडेकर हे आपल्या व्यवसायात तोट्यात गेल्याचे आपल्याला माहित होते. सद्यस्थितीत ते घरी नाहीत. ते कुठे आहेत? हे आपल्याला माहिती नाही, असे असताना या ठिकाणी माझी ओळख असलेले सपकाळ व त्याचे अन्य मित्र सावंतवाडीत आले. त्यांनी मला बोलावून आपल्याला साइटवर जायचे आहे, असे सांगून मला गाडीत बसविले व त्यानंतर माझ्याशी दादागिरी केली. त्यानंतर मला आपल्या गाडीत कोंबून आरोस येथील एका बंद घरात नेले. त्या ठिकाणी आपल्याला कोंबून मारहाण करण्यात आली. त्यानंतर पार्सल जेवण घेऊन आपल्याला जेवू घालण्यात आले. यावेळी झालेल्या मारहाणीत माझे घड़ तुटल्यामुळे माझ्या गुगल पे वर घड्याळाचा खर्च म्हणून दहा हजार रुपये त्यांनी पाठवले. त्यानंतर मला ते पुन्हा सावंतवाडीत घेऊन आले व आपल्याला पोर्शे कार न्यायची आहे त्यामुळे चाव्या दे, असे सांगून त्यांनी मला धमकी देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपण चावी देण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी मला कारिवडेकर यांच्या अर्विघ्न अपार्टमेंट मधील फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीवर केमिकल टाकून ते सीसीटीव्ही बंद पाडले व त्यानंतर बिल्डिंगमध्ये घुसून फ्लॅटचे दरवाजे फोडले. मात्र त्या ठिकाणी काही आढळून आले नाही. त्यानंतर ते पुन्हा सर्वोदयनगर येथील बंगल्याकडे गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला प्रथम सीसीटीव्ही सगळे बंद कर, असे सांगून धमकी दिली व त्या ठिकाणी आपल्याला मारहाण केली. त्यानंतर आपण आरडाओरड केल्यानंतर त्यांचे मित्र त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही मारहाण करून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, असे सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या दोन्ही तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पुण्यातील पाच जणांवर अपहरण व घरफोडी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तर बांद्यातील चौघा युवकांसह सावंतवाडीतील नितीन यांच्या विरोधात जीवे ठार मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर संबंधित आठही संशयितांना २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. फरार असलेल्या तहा याचा शोध घेत आहोत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.














 
	

 Subscribe
Subscribe









