कोकणी माणसाचं मत नेमकं कोणाला ?
चिन्मय घोगळे / सिंधुदुर्ग
विकास… विकासाची नेमकी व्याख्या काय ? हे कोकणातील सध्याभोळ्या माणसाला आजही कळलेलं नाही. कोकणी माणसाच्या याच भाबडेपणाचा फायदा घेऊन आजवर या राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीप्रमाणे विकासाची व्याख्या तयार केली आहे. केवळ रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट म्हणजे विकास असं कोकणी माणसाच्या मनावर जाणीवपूर्वक बिंबवले गेले आहे. त्यामुळे कोकण विकासाच्या गाडीने चुकीचा ट्रॅक पकडला असून कोकणातील मूळ प्रश्न आजतगायत अनुत्तरित राहिले आहेत.
आज कोकणातील अनेक रस्ते अगदी चकाचक झाले आहेत. परंतु नेमकी किती कोकणी माणसांची वाहने या रस्त्यावरून धावतात ? कोकणातील घराघरात पाणी पोहोचले आहे. परंतु या पाण्याच्या उपभोग नेमकी किती माणसे घेतात ? आज गावागावात पक्की आणि प्रशस्त घरे झाली आहेत. परंतु या प्रशस्त आणि भक्कम असणाऱ्या या घरांमध्ये केवळ २ ते ३ माणसं वावरताना दिसतात. कित्येक घरांचे दरवाजे तर वर्षातून फक्त एकदाच उघडतात. एरवी गणेश चतुर्थी, होळी, शिमगा आणि जत्रेला गजबजलेली घरं पुढील वर्षभरासाठी मुकी आणि बहिरी होऊन जातात.
आज कोकणाच्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. एखादा सिरियस पेशंट असेल तर डॉक्टर गोवा किंवा मुंबईला घेऊन जायला सांगतात. उच्च शिक्षणासाठी कोकणातील मुलांना आजही मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं. अनेकांना ते शक्य नसल्यानं अर्ध्यावरच शिक्षण सोडावं लागतं. “मराठी शाळा वाचल्या पाहिजेत” हे आपण बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतो. परंतु विद्यार्थी नसल्याने आज कित्येक मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. किंबहुना काही शाळा तर बंद देखील पडल्या आहेत. या सगळ्या प्रश्नांचं मूळ मात्र एकच आहे. ते म्हणजे कोकणातून शहराच्या दिशेनं होणारं स्थलांतर. या मुळावरच जर घाव घातला तर सगळ्या समस्या अगदी चुटकीसरशी सोडवल्या जातील.
कोकणातील स्थलांतराची आज अनेक कारणे आहेत. परंतु मुख्य कारण कोणतं असेल तर ते म्हणजे रोजगाराचा अभाव. आज कोकणातील सर्वाधिक स्थलांतर हे रोजगाराच्या अभावामुळे होत आहे. आज शिक्षणाला साजेशी नोकरी आणि वाढत्या महागाईच्या काळात पुरेसा पगार उपलब्ध नसल्याने कित्येक तरुण शहराच्या दिशेने वळत आहेत आणि तिथेच स्थायिक होत आहेत. परिणामी त्यांची पुढील पिढी तिथेच शिक्षण घेत असल्यामुळे गावातील शाळांची पटसंख्या कमी होऊन गावातील शाळा बंद होत चालल्या आहेत.
कोकणची ही विदारक परिस्थिती बदलायची असेल तर शहराकडे होणारं स्थलांतर रोखणं फार गरजेचं आहे. यासाठी एकमेव उपाय म्हणजे कोकणात रोजगार निर्मिती होणं. कोकणात रोजगार निर्मिती झाल्यास भविष्यात होणारं स्थलांतर रोखलं जाईल. तसेच पुणे – मुंबईत कामासाठी गेलेले अनेक तरुण पुन्हा कोकणात परततील. गावातील शाळांना पुन्हा सुगीचे दिवस येतील. बंद घरांच्या मुक्या झालेल्या भिंती पुन्हा बोलू लागतील. तसेच एवढ्या सगळ्या लोकांची दखल शासनाला देखील घ्यावीच लागेल. परिणामी रस्ते, पाणी, घरे, स्ट्रीट लाईट यामध्ये सुधारणा तर होईलच शिवाय एवढ्या लोकांसाठी शासन स्वतः पुढाकार घेऊन मुंबई – पुण्याच्या धर्तीवर आरोग्य यंत्रणा अपडेट करेल.
मोठ्या उद्योगासाठी उच्चशिक्षित व तज्ञ कारागिरांची आवश्यकता निश्चितच भासणार आहे. यासाठी तरुणांना उच्च शिक्षण देणारी शिक्षणसंस्था देखील भविष्यात उभी राहून मुलांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न देखील आपोआप सोडवला जाईल .
एकंदरीत कोकणात रोजगार निर्मिती झाल्यास ओस पडत चाललेले कोकण बहरू शकेल. परंतु ही परिस्थिती बदलण्याची ताकद फक्त कोकणी माणसातच आहे. अनेकदा राज्यकर्त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण आपलं बहुमूल्य मत त्यांना देऊन टाकतो. परंतु यावेळी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता जो आमच्या हातांना रोजगार देईल त्यालाच आम्ही आमचं मत देऊ असे ठामपणे सांगितले पाहिजे. असे झाल्यास निश्चितच याचे सकारात्मक परिणाम काही वर्षांनी तरी दिसून येतील. “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या सद्गुरू श्री वामन राव पै यांच्या वाक्याप्रमाणे कोकणच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार कोकणी माणूस स्वतः आहे. फक्त गरज आहे ती आपल्या बहुमूल्य मताची ताकद ओळखून ते योग्य उमेदवाराच्या पदरात टाकण्याची…