सिंधुदुर्ग विकासाच्या वाटेवर की विनाशाच्या उंबरठ्यावर ?
✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/ प्रतिबिंब
सिंधुदुर्ग… महाराष्ट्राच्या माथ्यावरचा एक शांत आणि सुसंस्कृत असा हिरवागार मुकुट. या जिल्ह्याची ओळखच अशी की, जिथे कोकणची माणसं साधी, भोळी आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी, असं गाणंही रुढ झालंय. इथली माणसं जीवाला जीव लावणारी, मायेची पाखर घालणारी. पण, अलीकडच्या काळात या शांततेला जणू ग्रहण लागलंय की काय, असा प्रश्न आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे उभा राहिला आहे. स्त्रियांपासून ते पुरुषांपर्यंत, युवकांपासून ते वृद्धांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत, आत्महत्येच्या बातम्यांनी वृत्तपत्रांची पाने भरू लागली आहेत. ८४ लक्ष योनी फिरून मिळालेला हा मनुष्यजन्म इतका फोल का वाटू लागलाय, की मरणाचा मार्ग लोकांना सोपा वाटू लागला आहे?
बदलती जीवनशैली: आत्महत्येचे मूळ कारण
या विनाशाच्या वावटळीमागे जर कोणते एक मुख्य कारण असेल, तर ती आहे बदलती जीवनशैली. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, जिथे चौघे भाऊ एकत्र नांदत होते. एकाची समस्या म्हणजे संपूर्ण कुटुंबाची समस्या असायची. प्रत्येक अडचणीवर सर्वजण एकत्र येऊन मात करत होते, एकमेकांचा आधार बनून उभे राहत होते. पण, आजची ‘TTMM’ (तुझं तू, माझं मी) ही जीवनपद्धती एकत्र कुटुंबांना गिळंकृत करत आहे. सगळी जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर येते, आणि पडत्या काळात आधार द्यायला कोणीही नसते. या एकटेपणाची पोकळी कधी कधी इतकी मोठी होते की, जगणे असह्य वाटू लागते.
पालकांकडून होणारे लाड आणि न्यूनगंड
पूर्वी चार-चार मुलांनी घर भरलेले असायचे. आज ‘हम दो, हमारे दो’ मुळे घरात एक किंवा दोनच मुले असतात. लहानपणापासूनच त्यांचे अतोनात लाड केले जातात, त्यांना मायेच्या पंखांखाली इतके सुरक्षित ठेवले जाते की, त्यांना परिस्थितीची झळच लागत नाही. ही मुले जेव्हा आई-वडिलांच्या या मायेच्या पंखांपासून दूर होतात, तेव्हा बाहेरच्या जगातील कठोर वास्तवाचा सामना त्यांना करता येत नाही. यातून त्यांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड घर करतो, जो त्यांना आयुष्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यापासून परावृत्त करतो.
शिक्षणपद्धतीत बदल – शिस्त गमावलेली पिढी
पूर्वी शाळेत ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ अशी परिस्थिती होती. पालक मुलांना शिक्षकांच्या स्वाधीन करताना ‘मारा, झोडा, काय करायचं ते करा, पण माझा मुलगा पास झाला पाहिजे’ असे सांगायचे. शिक्षकांच्या कडक शिस्तीमुळे ही मुलं भविष्यात आगीत तापवलेल्या सोन्यासारखी चमकत होती. पण, आता परिस्थिती उलट आहे. ‘नापास झाला तरी चालेल, पण माझ्या मुलाला हात लावायचा नाही’ अशी जणू सक्त ताकीदच पालकांकडून दिली जाते. या अतिसंरक्षणामुळे आजच्या पिढीला जगण्याची शिस्त राहिलेली नाही. आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे कसे जायचे, हेच त्यांना माहीत नाही. परिणामी, ही पिढी भरकटत चालली आहे.
अपेक्षाभंग आणि काल्पनिक दुनियेतील वास्तवाचा अभाव
एकुलती एक लाडकी मुलगी असल्याने तिचे लहानपणापासूनच सर्व हट्ट पुरवले जातात. तिने मागितलेली वस्तू लगेच तिच्या हातात असते. अशा मुलींना विवाहा नंतर सासरी तसे आयुष्य जगता येत नाही. शिवाय, सध्याच्या विवाहित स्त्रिया चित्रपट आणि मालिकांमध्ये इतक्या गुरफटल्या आहेत की, त्या मालिकेतील नायिकेशी स्वतःची तुलना करू लागल्या आहेत. त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु मालिका आणि वास्तविक आयुष्य यातील साधा फरकही त्यांच्या लक्षात येत नाही. याचा परिणाम अपेक्षाभंगात होतो, ज्यामुळे विवाहित महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
स्पर्धेचे ओझे आणि पालकांच्या अपेक्षांचा भार
पूर्वी विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे, गृहपाठ करणे आणि परीक्षेत पास होणे एवढेच ध्येय होते. खाजगी शिकवणी, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज हे त्या काळातील मुलांना आणि पालकांना माहीतही नव्हते. आता मात्र प्रत्येक पालकाला आपले मूल सर्वगुणसंपन्न असावे, इतरांपेक्षा वरचढ असावे असे वाटते. यातूनच प्रायव्हेट क्लासेस, म्युझिक क्लासेस, स्पोर्ट क्लासेस जन्माला येतात. पालक आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादतात. मुलांकडून त्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास पालकांचा ‘इगो’ दुखावतो, आणि अशी मुले पुढे नैराश्याची शिकार होतात.
तंत्रज्ञानाचा विळखा आणि जीवनातील असमाधान
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कामाचे तास अमर्याद झाले आहेत. पूर्वी ज्या कामाला आठवडा लागत होता, ते काम आता काही तासांत होते. कामे सहज आणि जलद झाली असली, तरी माणसाचे आयुष्यही वेगवान बनले आहे. ज्या घड्याळाची निर्मिती माणसाने केली, आज तेच घड्याळ माणसाला कठपुतलीप्रमाणे नाचवत आहे. माणूस घड्याळाचा गुलाम बनला आहे. जागतिकीकरणामुळे जग जवळ येत असले तरी, माणसे दुरावत चालली आहेत हे देखील तितकेच सत्य आहे. कामाचा वाढता ताण असह्य होत आहे. या वेगवान आयुष्याप्रमाणे माणसाचे अन्नही ‘फास्ट’ झाले आहे. या फास्ट फूडमुळे अनेक आजारांनी एखाद्या नको असलेल्या पाहुण्याप्रमाणे शरीरात घर केले आहे. या आजारांनी त्रस्त होऊन कित्येक जणांनी स्वतःच्या आयुष्याची दोरी कापून टाकली आहे.
लालसेचा नाग आणि कर्जाचा डोंगर
पूर्वीच्या काळी गरिबीतही माणसांमध्ये समाधान होते. पण आज माणसांकडे पैसा आला, पण समाधान मात्र कायमचे निघून गेले आहे. साधा पिठलं-भात खाऊन लोक छोट्याशा घरात सुखाने राहत होते. आता ज्याच्याकडे दुचाकी आहे, त्याला बुलेट पाहिजे, ज्याच्याकडे बुलेट आहे त्याला चारचाकी पाहिजे, आणि ज्याच्याकडे चारचाकी आहे त्याला बी.एम.डब्ल्यू. हवी असते. यामुळे आवश्यकता नसतानाही अनावश्यक खर्च वाढू लागले आहेत. माणसाला गरज (Need) आणि लालसा (Greed) यातील फरक ओळखता येत नाही. माणसाने लालसेलाच आपली आवश्यकता बनवून टाकले आहे. अनेकदा माणूस इतरांचे अनुकरण करायला जातो. दुसऱ्याने गाडी घेतली की आपणही तशीच गाडी घ्यायला जातो, दुसऱ्याने बंगला बांधला की आपणही तसाच बंगला बांधायला जातो. बेडूक आणि बैलाच्या गोष्टीतल्या बेडकाप्रमाणे आपली अवस्था होते. अनेकदा लग्नांमध्ये पैशांची मुक्तहस्ताने उधळण करून खोटे थाट मिरवले जातात. केवळ लोकांसमोर खोट्या प्रतिष्ठेपाई अनावश्यक खर्च केला जातो. या सर्व कारणांसाठी बँकांकडून किंवा फायनान्स कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले जाते. शेवटी कर्जाचे हप्ते भरताना नाकी नऊ येतात, खर्चाचा ताळमेळ बसत नाही आणि माणूस नैराश्याच्या खोल गर्तेत जातो.
निष्कर्ष आणि भविष्याची हाक
सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित नसून, ही समस्या आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला भेडसावत आहे. बदलती जीवनशैली, त्यामुळे होणारा अनावश्यक खर्च, आणि गळेकापू स्पर्धा या सर्वांमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. यावर सरासर विचार होऊन जीवनशैलीत मूलभूत बदल करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात यापेक्षाही भयंकर स्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सामाजिक रोगावर वेळीच उपाययोजना न केल्यास, सुसंस्कृत महाराष्ट्राचे हे चित्र लवकरच विनाशाच्या गर्तेत लोटले जाईल.
यावर आपण काय विचार करता?
ही वाढती आत्महत्येची समस्या रोखण्यासाठी आपण एकत्रितपणे काय करू शकतो?













