माणूस म्हटलं की आयुष्यात चढउतार हे आलेच… माणसाचे आयुष्य म्हणजे खरंतर ऊन – पावसाचा खेळ ! या संकटात जो खचतो तो मातीमोल होतो. परंतु या संकटांशी जो दोन हात करून त्यांनाच मातीत मिळवतो तोच ठरतो खरा संघर्षयोद्धा ! आज आपण अशा एका संघर्षयोद्ध्याच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणार आहोत. जो आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करत आपल्या नावाप्रमाणेच नेहमी अजेय राहिला आहे. तो योद्धा म्हणजे कुडाळ शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. अजय अशोक शिरसाट
श्री. अजय अशोक शिरसाट यांचा जन्म कुडाळ शहरातच एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आयुष्यातील सुरुवातीचे काही दिवस सामान्यच गेले. परंतु वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या आईच्या खांद्यावर येऊन पडली . यानंतर आयुष्याच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. कमावणारे हात दोन व खाणारी तोंडे तीन त्यामुळे आईची फार ओढाताण व्हायची. संकटे जणू चारही बाजूंनी आक्रमण करत होती. परंतु अजय शिरसाट यांचा जन्मच मुळात संघर्ष करण्यासाठी झाला होता. या संकटांशी एखाद्या योध्याप्रमाणे झुंज देत त्यांनी आपल्या विजयाचा मार्ग अखेर निवडलाच !
सुरवातीला आईसोबत समादेवी मंदिराकडे रस्त्यावर बसून मसाला विकण्याचे काम देखील त्यांनी केले. इयत्ता आठवीपासून काकांचा पिग्मी कलेक्शनचा व्यवसाय सांभाळायला अजय यांनी सुरुवात केली. तिथूनच अजय यांना व्यवसायिकतेचे बाळकडू मिळाले आणि व्यापारी जगताशी ओळख झाली.
लहानपणापासूनच मैदानी खेळ, व्यायाम यांची आवड त्यांना संघाच्या शाखेकडे जेऊन जाणारी वाट ठरली. पुढे संघाशी असणारे त्यांचे नाते कालांतराने अधिकच दृढ झाले. महाविद्यालयीन दशेत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम हाती घेतले. डॉ. अभय सावंत, भास्कर साधले, लालजी पागी, अप्पा लुडबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चांगले काम केले. १९९७ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ‘खेळीयाड’ हा कार्यक्रम कुडाळमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची जबाबदारी अजय यांच्यावर सोपवण्यात आली होती. आव्हान तर फार मोठे होते. परंतु मुळातच असलेल्या लढावू स्वभावामुळे त्यांनी हे आव्हान सहज पेलले व कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.
पुढे प्रवासाची दिशा बदलली आणि उच्च शिक्षणासाठी त्यांना मुंबई गाठावी लागली. विप्रो सर्टिफाइड हार्डवेअर इंजिनियर म्हणून अजय हे कॉम्पॅक कंपनीत सीनियर इंजिनियर बनले. परंतु गावच्या मातीशी जोडली गेलेली नाळ, या मातीतील आपलेपणाचा ओलावा व त्यातून निर्माण होणारा प्रेमाचा मृद्गंध त्यांना पुन्हा गावाकडे घेऊन आला. गावी येऊन त्यांनी ‘माय कंप्युटर’ नावाने कंप्युटर सेल्स अँड सर्व्हिसचे शॉप सुरू केले. रत्नागिरी – सिंधुदुर्ग बरोबरच गोव्यात देखील आपल्या कामाचे क्षेत्र त्यांनी विस्तारत नेले.
अजय यांना बालपणापासूनच उंच इमारतीचे आकर्षण होते. हे आकर्षणच त्यांना बांधकाम क्षेत्राकडे घेऊन गेले. २०१४ साली त्यांनी बांधकाम क्षेत्रात पदार्पण करत सर्व सोयसुविधा यांनी युक्त असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क कुडाळ शहरातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाच्या पायभरणीला सुरवात केली. आज पुण्या – मुंबईसारख्या सर्व सोयीसुविधांनी असलेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क हा गृहप्रकल्प अगदी दिमाखात उभा आहे. अजय शिरसाट हा असा एक तेजस्वी सूर्य आहे ज्याच्या तेजाने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांचेच आयुष्य तेजोमय बनले आहे.
अजय शिरसाट यांच्यावर कर्णाचा हा प्रभाव राहिला.
कोणालाही मदत करताना, दान करताना आपले नाव व्हावे, आपला फोटो झळकावा अशी अपेक्षा त्यांनी कधीही केली नाही. कोरोनाचा कठीण कालावधी अनेकांची खडतर परीक्षा घेणारा होता, अनेकांच्या आयुष्याची घडी त्यात बिघडून गेली होती. या काळात अजय शिरसाट यांनी केलेले मदतकार्य फार मोठे होते, पण त्याची जाहिरात कुठेही केली गेली नाही. कदाचित, आजच्या झगमगाटी प्रसिद्धीवरच जिथे नेतृत्व ठरवले जाते, या काळात ही गोष्ट त्यांच्यातल्या युवा नेतृत्वासाठी घातक ठरण्याचीच जास्त शक्यता आहे. काळाप्रमाणे त्यांना बदलावे लागेल हा त्यांच्या मित्रपरिवाराचा नेहमीच आग्रह राहिला आहे. आजही तळागाळात काम करणे आणि प्रसिद्धीपासून दूर राहणे या गोष्टी त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होऊन बसलेल्या आहेत.
आज आपली पत्नी आर्या, मुलं आर्यन व ओवी, आई, भाऊ संजय यांच्यासमवेत आनंदाने राहत आहेत. आयुष्यात येणाऱ्या संकटांनाच संधी मानून वाटचाल करणाऱ्या या संघर्षयोद्ध्याची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. या संघर्षयोद्ध्याचा आज वाढदिवस आहे. आपल्या स्वप्नांच्या अवकाशात उत्तुंग भरारी घेण्याची ताकद त्यांच्या पंखांमध्ये येऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना !













