पालकमंत्री नाम. नितेश राणे
कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार BSNL व महावितरण विभागातील अधिकारी यांची संयुक्त बैठक सार्वजनिक विश्रामगृह, कणकवली येथे पार पडली.
बैठकीदरम्यान पालकमंत्री श्री. राणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ३७ प्रलंबित वीजजोडण्या चालू महिन्याच्या अखेरीस म्हणजेच सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण कराव्यात. नागरिकांच्या सोयीसाठी व संपर्कव्यवस्थेच्या मजबुतीसाठी हे काम प्राथमिकतेने पूर्ण व्हावे असेही ते म्हणाले.
या बैठकीत BSNL च्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोबाईल टॉवर वीजजोडणी स्थितीचा आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०३ पैकी ६६ टॉवर ठिकाणी वीज जोडणी मिळाली असून, उर्वरित ३७ ठिकाणी काम प्रलंबित आहे. उर्वरित टॉवरवर वीज जोडणी का प्रलंबित आहे? त्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उत्तर देताना सांगितले की, ज्या ठिकाणी नवीन रोहित्र (Transformer) बसविण्याचे काम आहे, तेथेच विलंब झाला आहे. ही कामे प्रगतीपथावर असून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, कुडाळचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, कणकवलीचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी तसेच बी एस एन एल चे अधिकारी उपस्थित होते.













