✒️ चिन्मय श्रीराम घोगळे / प्रतिबिंब
कोकण…! महाराष्ट्राच्या पर्यटनाची पंढरी अशी या कोकणाची ओळख. आपलं कोकण जसं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे अगदी तसंच संस्कृती व परंपरांसाठी देखील प्रसिद्ध आहे. कोकणातील गणेशोत्सव तर जगप्रसिद्ध आहे. यावेळी केली जाणारी भजने, आरत्या, फुगड्या तर शिऱ्यातील मनुक्यांप्रमाणे उत्सवाची शोभा वाढवतात. कोकणी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही असला तरी गणेश चतुर्थीच्या सणाला आवर्जून उपस्थित राहतो. पूर्वीच्या काळी हा गणेशोत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा होत असे. परंतु, काळानुसार यामध्ये अनेक बदल होत गेले. आताच्या काळात अनेक पालक आपल्या मुलांना सांगतात आमच्या लहानपणी गणपतीत आम्ही असं करायचो, तसं करायचो अशी मौजमजा करायचो. त्या मौजमजा, त्या गोष्टी कालांतराने लोप पावल्या आणि राहिल्या त्या फक्त आठवणी… ज्या अश्रुंच्या रूपात डोळ्यातून बाहेर येतात आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या करून जातात…
सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ हेतू आणि घरोघरी गणपतीची संकल्पना
सर्वप्रथम लोकमान्य टिळकांनी समाजामध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या सार्वजनिक गणेशोत्सवामुळे विविध विचारांचे लोक एकत्र येऊ लागले. विचारांची आदानप्रदान होऊ लागली. जर समाजातील विविध विचारांचे, विविध संस्कृतीचे लोक या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येत असतील तर घरातील माणसं का एकत्र येणार नाहीत ? या विचारातून घरोघरी गणपती ही संकल्पना रूढ झाली.
एकत्र कुटुंबपद्धती आणि गणेशोत्सव
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धती होती. चार भावांचे एकत्र कुटुंब असले तरी दोघे भाऊ गावी राहून शेती करत असत तर उर्वरित दोन भाऊ व त्यांचे कुटुंब हे नोकरी – धंद्यानिमित्त शहरात राहत असत. परंतु गणेश चतुर्थीच्या काळात मात्र हे चारही भाऊ एकत्र येत आनंदाने गणेशोत्सव साजरा करत असत. गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी कामाची मोठी लगबग असते. परंतु सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यामुळे काम अगदी सहज होत असे. शिवाय कामाच्या विभागणीमुळे श्रम देखील कमी पडत असत. आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असणारे व्यवस्थापन आणि टीम वर्कचे धडे यातूनच मिळत. सर्वांमध्ये एकोप्याची भावना निर्माण होऊन आपापसातले प्रेम वाढत असे. कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास इतर लोक तिची काळजी घेत. इतरांशी जुळवून घेण्याची सवय मुलींना यातूनच लागत असे. पुढे लग्नानंतर सासरी या मुले सहज रुळून जात. भावंडांमध्ये कधी भांडणे झाल्यास काही दिवस किंवा महिन्यांपुरता अबोला असे. गणेश चतुर्थी आली की, “माझो बाबा देव असा, माझ्या देवासाठी माका जावकच होया” ही भावना मनात असे. त्यामुळे तात्पुरता अबोला निघून जाई आणि ती जागा पुन्हा प्रेम व आपुलकीने भरली जाई. १५ – २० माणसे एका पंगतीत जेवत असत, गप्पा गोष्टी रंगत असत, बालपणीच्या अनेक आठवणी ताज्या होत. हे सगळं पाहताना ते घर म्हणजे भरलेलं गोकुळ वाटे.
विभक्त कुटुंबपद्धती आणि बदललेली परिस्थिती
आता एकत्र कुटुंब पद्धतीची जागा विभक्त कुटुंब पद्धतीने घेतली. आर्थिक सुबत्ता आली. घरातील पाखरं उडून दुसऱ्या फांदीवर जाऊन बसली. प्रत्येकाने स्वतःचे घरटे बांधून आपला वेगळा संसार थाटला. एका कुटुंबाची चार कुटुंबे झाली. परिणामी एका गणपतीच्या जागी चार गणपती झाले. त्यामुळे जी कामे चौघे जण मिळून करत होते. त्याच कामांची जबाबदारी एकट्यावर येऊन पडली. प्रेम आणि मायेचा ओलावा तर कधीच सुकून गेला. आपल्या कुटुंबाचं रूपांतर माझ्या कुटुंबात कधी झालं काही कळलंच नाही ! हल्ली तर वरसल नावाचं नवीन काहीतरी फॅड आलं आहे. प्रत्येक वर्षी एकेकाने गणपतीची जबाबदारी घेऊन जणू काही वार्षिक पूर्ण करायचं. गणेशोत्सव सुरू करण्याचा हेतूच मुळात बाजूला राहिला. राहिली ती फक्त जबाबदारी जी ओढून ताणून कशीतरी पूर्ण केली जाते. सध्याच्या काळात आजही काही ठिकाणी एकत्रितपणे हा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये वेताळ बांबर्डे गावातील गावडे कुटुंबीय आणि देवगड येथील खवळे कुटुंबीयांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
गणेश मूर्तीमधील बदल – माती ते प्लास्टर ऑफ पॅरिस
पूर्वीच्या काळी गणपती बाप्पाच्या मूर्तीचा आकार लहान होता. त्यामुळे डोक्यावरून बाप्पाला आणणे शक्य होते. कालांतराने एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबपद्धती झाली. आता याच कुटुंबामध्ये स्पर्धा सुरू झाली. इतरांपेक्षा माझा गणपती आकाराने मोठा असावा या अट्टाहासमुळे गणेशमूर्तींचे आकार वाढले. परिणामी त्यांचे वजन देखील वाढले. एवढ्या वजनाची मूर्ती डोक्यावर उचलून नेणे शक्य नसल्यामुळे गाडीमधून नेण्याची नवी परंपरा सुरू झाली. कालांतराने मातीच्या मूर्तींची जागा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) मूर्ती घेतली. कमी किंमत आणि वजनाने हलक्या असल्यामुळे लोक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना प्राधान्य देऊ लागले. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पाण्यात लवकर विरघळत नसल्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ लागलीच त्याहीपेक्षा गणेश मुर्त्या कित्येक दिवस पाण्यात तशाच दिसू लागल्या. ज्या गणपती बाप्पाचे आपण ११ दिवस एखाद्या लहान बाळाप्रमाणे लाड करतो, त्याला गोडधोड खाऊ घालतो विसर्जनानंतर त्याची अशी विटंबना पाहून अनेकांचे हृदय हेलावून गेले. त्यामुळे अनेकांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या जागी पुन्हा मातीच्या मुर्त्या वापरण्यास पसंती दर्शवली.
आगमन आणि विसर्जन
पूर्वी बाप्पाच्या आगमनावेळी “पाई हळूहळू चाला मुखाने गजानन बोला” हे गाणे गायले जाई. या गाण्याला टाळ – मृदुंगाची साथ असे. यावेळी स्त्रिया व पुरुष पारंपरिक पोशाख परिधान करून गाण्यावर ठेका धरत. तर विसर्जनाच्या वेळी बाप्पाला निरोप देताना “बाप्पा चालले अपुल्या गावाला, चैन पडे ना अमुच्या मनाला” असे म्हणत भरल्या डोळ्यांनी बाप्पाचा निरोप घेतला जाई. आता डीजेच्या कर्णकर्कश्य आवाजात बाप्पाचे विसर्जन केले जाते. ज्यामुळे हृदयविकार व उच्च रक्तदाब असलेल्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय कानांच्या श्रवणशक्तीवर देखील याचे विपरीत परिणाम होत आहेत.
पूर्वी आगमनाच्या वेळी पहाटे लवकर उठून जमीन शेणाने सारवली जाई. सारवण झाल्यानंतर त्यावर चुन्याची रांगोळी रेखाटली जाई. आता शेणाने सारवलेल्या जमिनीची जागा सिमेंट आणि पार्टएक्सच्या लाद्यांनी घेतली. ज्याच्यावर रेडीमेड रांगोळीचा स्टिकर चिकटवला जातो. परंतु, शेणाने सारवलेल्या जमिनीची सर या लादीला कधीही येणार नाही.
भजने आणि प्रसाद
पूर्वी संध्याकाळ झाली की घरातून आरत्या, भजने आणि फुगड्यांच्या आवाजांनी घर दुमदुमून जाई. “नेसली ग बाई चंद्रकला ठिपक्यांची” आणि “घोंगडीवाला कांबळीवाला” गाण्यांचे स्वर कानावर पडताच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत झोपेतून उठून गाण्याच्या ठेवण्यावर माना डोलावत. भजनानंतर प्रसाद म्हणून दिले जाणारे शेंगदाणा किंवा कडक बुंदीचे लाडू आणि करंजी यांची चव तर अमृताहूनही गोड वाटे. अगदी हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या सधन कुटुंबाच्या स्वयंपाक घरातून उसळीचा घमघमाट सुटे. ज्यामुळे भजनाला अजूनच रंगत येत असे. बुंदीचे लाडू, करंजी आणि उसळीपासून सुरू झालेला हा भजनांचा प्रवास आता चायनीज भेळ व गोबी मंचुरियन पर्यंत येऊन पोहोचला आहे. अस्सल भारतीय असलेल्या गणेश चतुर्थीच्या सणाला प्रसाद म्हणून सध्या चायनीज पदार्थ दिले जातात. केवढा हा विरोधाभास ?
संस्कृती आणि परंपरा
भारतात विविध धर्मांचे लोक मिळून मिसळून राहतात. परंतु इतर धर्मीय आपली संस्कृती व परंपरांचे कटाक्षाने पालन करतात. हिंदू धर्मीयांकडून देखील आपल्या संस्कृती व परंपरांचे पालन होणे फार गरजेचे बनले आहे. अन्यथा हडप्पा व मोहेंजोदडो प्रमाणे इतिहासाच्या पुस्तकात कैद होऊन जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
हे असं का होतं याचा विचार केला पाहिजे ? – निलेश जोशी (पत्रकार)
वरील सर्व गोष्टींच्या मुळाशी जाऊन विचार करता याला कुठेतरी मुलांचे पालक जबाबदार आहेत. काही लोक नोकरीनिमित्त शहरांमध्ये राहत असले तरी त्यांची नाळ गावाशी एवढी जोडलेली असते की ते गावी येण्यासाठी निमित्त शोधत असतात. गणेश चतुर्थी, दिवाळी, दसरा, वार्षिक जत्रोत्सव, होळी, शिमगा, पाडवा, उन्हाळी सुट्टी आदींचं निमित्त काढून वर्षातून १० वेळा गावी येतात. सोबत येताना आपल्या कुटुंबालाही घेऊन आल्यामुळे पत्नी व मुलांनाही गावाची ओढ लागते. या उलट काही लोक तर कधीच गावी येत नाहीत. गावी भाऊ आहे तो बघेल. आपण पैसे पाठवले की आपली जबाबदारी संपली. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांची पुढची पिढी देखील संस्कृती विसरत चालली आहे. माझा भाऊ पुणे येथे एका नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहे. परंतु गावी आल्यावर तो न्हाणीघरातील चुलीवर स्वतः पाणी तापवतो. गावी येताना आपल्या पत्नीसह मुलांना घेऊन येतो. मुलांना आपल्या बालपणीच्या गमतीजमती सांगताना आठवणींमध्ये हरवून जातो. त्याच्यामुळे त्याच्या मुलांनादेखील गावाची ओढ निर्माण झाली आहे. आताच्या पिढी विस्मृतीच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. उंबरठा ओलांडण्यापूर्वी पालकांनी स्वतः एक पाऊल मागे घेत या पिढीला मागे खेचणं आवश्यक आहे.
प्रत्येकाने स्वतःचा अहंकार (इगो) बाजूला ठेवणं गरजेचं आहे – राणे काका (पणदूर)
कोणत्याही नात्यापेक्षा आपला अहंकार (इगो) महत्वाचा नाही. आपलं नातं टिकत असेल तर प्रत्येकाने एक पाऊल मागे येणं गरजेचं आहे. सध्या गावातील घरामध्ये राहणारा भाऊ विचार करतो नेहमी सगळं मलाच करावं लागतं बाकीचे फक्त ‘आयत्यावर कोयता’ मारायला येतात. तर नोकरी – धंद्यानिमित्त शहरात राहणार भाऊ म्हणतो गावाच्या घरात जो राहतो त्यानेच सगळं बघावं. दोन्ही भावांच्या या भूमिकेमुळे “एकाक एक नसाय नि केगदीत गावलो देसाय” या मालवणी म्हणीप्रमाणे त्या कुटुंबाची परिस्थिती होते. आम्ही एकूण तिघे भाऊ… तिघेही तीन विचारांचे. आमच्यातील या वैचारिक मतभेदांमुळे आमच्यात कडाक्याची भांडणं होतात. परंतु आमच्या या भांडणामध्ये आमच्या बायका कधीही हस्तक्षेप करत नाहीत. या तिन्ही जावा – जावा सख्ख्या बहिणींप्रमाणे घरात वावरतात. आमच्या मुलांमध्ये माझा मुलगा सर्वात मोठा त्याच्या मागची बहिण. दुसऱ्या भावाला दोन मुली. तर सर्वात लहान भावाला एकच मुलगी. या सगळ्या मुली माझ्या मुलाकडे नेहमी हट्ट करतात व त्याला मोठ्या भावाचा मानही देतात. तर माझा मुलगा देखील त्यांची तेवढ्याच प्रमाणे काळजी घेतो. त्यामुळे आमचं कुटुंब रेशमाच्या मुलायम धाग्याने घट्ट बांधलं गेलं आहे. ज्याप्रमाणे साखर, रवा, दूध, काजूगर, बदाम, मुनके, चारोळ्या हे पदार्थ एकत्र येऊन मधुर अशी खीर बनते. त्याप्रमाणे आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आल्यावर कुटुंबातील माधुर्य वाढते.













