कुडाळ : तालुक्यात झाराप येथे मुंबई गोवा महामार्गवर असणारे बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र त्याचा तो प्रयत्न फसला. बँकेच्या एटीएममधील साडे आठ लाख रुपये रोकड सुरक्षित आहे. या प्रकरणी बँक सहायक व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या एटीएममध्ये सुरक्षेसाठी कोणीही नसते. याचा फायदा घेऊन गुरुवारी मध्यरात्री २ वाजता ‘या एटीएमच्या तिजोरीचा दरवाजा चोरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक वैशाली अडकुरी, पोलीस निरीक्षक प्रवीण धडे, पिंगुळी बिट अमलदार ममता जाधव, सुबोध मळगावकर, समीर बांदेकर, सुप्रिया भागवत, श्री. निकम, अमोल बंडगर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिस पाटील शमिका हरमलकर यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांसोबत श्वानपथक तसेच फिंगरप्रिंट तज्ज्ञही एटीएम केंद्रात पोहोचले होते. एटीएम कापण्यासाठी चोरटयांनी आणलेले कटर आणि इतर साहित्य एटीएमच्या बाहेर टाकलेले पोलिसांना सापडले.