सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाजाच्यावतीने महायुतीला जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे. नाभिक समाज बांधवांच्या सुखःदुखःत नेहमीच महायुतीची माणसं सहभागी होत असल्याने आणि नाभिक समाजाच्या विविध समस्यांमध्ये महत्वाची मागणी असणारे केशशिल्पी महामंडळाची स्थापना महायुतीच्या काळात झाल्याने नाभिक समाजाकडून जिल्हयातील तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ यंत्रणा उभी करण्यात येणार आहे, अशी माहिती नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण व युवा जिल्हाध्यक्ष रूपेश पिंगुळकर यांनी दिली.नाभिक समाजाच्या पाठिंब्याबाबत बोलताना श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, नाभिक समाजाच्या विकासाकासाठी केंद्र शासनाने राबविलेल्या विश्वकर्मा योजनेतून अनेक नवोदित कलाकारांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी मदत होणार आहे. सध्या या योजनेतून अनेकांची ट्रेनिंग पूर्ण झालेली असून लवकरच त्यांचा व्यवसाय सुरू करण्याबाबत बँकांकडून कर्ज उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाने विश्वकर्मा योजना हाती घेवून अनेकांना हक्काचा व्यवसाय सुरू करून आपल्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून दिलेले आहे. यामुळे गावातील युवक नोकरीच्या मागे न राहता स्वतःचा व्यवसाय स्वतःच्याच गावात सुरू करू शकणार आहे. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीच्या शासनाने नाभिक समाज आभार मानत आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.