शब्दांकन: बी.ए. एलएल.बी. सायली राजन सामंत, नेरूर कुडाळ. ✒️
आषाढी कार्तिकी पंढरीची ओढ
मुखी नाम गोड पांडुरंग
चालती पाऊले पंढरीची वाट
वारीचा तो थाट काय वर्णू
भक्तालागी विठू जळी स्थळी दिसे
लागलेसे पिसे सावळ्याचे
उभा विटेवरी कटेवरी हात
असा जगन्नाथ पंढरीचा
चंद्रभागेतीरी भक्तांचा तो मेळा
आनंद सोहळा भक्तीमय ||….
भक्तीमार्गाचे माहात्म्य पटवून देणारे पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थक्षेत्राचे माहेरघर. आणि त्यात आषाढी आणि कार्तिकी एकादशीची वारी म्हणजे जणू दुग्धशर्करा योगच! पंढरीच्या या वारीमध्ये सहभागी होण्याचे भाग्य ज्या व्यक्तींना प्रत्यक्ष लाभते, त्या सर्वांना साक्षात वैकुंठीच्या नारायणाला भेटून आल्याचे सौख्यसुख प्राप्त होते. कारण पंढरपूरच्या वारीला जाणे हे प्रत्येक माणसाच्या नशिबी नसते; त्यासाठी पूर्वजन्मीचे पुण्य गाठीशी असणे फार महत्त्वाचे असते. ते पूर्वजन्मीचे पुण्य सकल संतांच्या गाठीशी होते म्हणूनच तर त्यांनी भावपूर्ण अभंगाचे निरूपण करताना सांगितले आहे, “जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली.” या अभंगरुपी निरूपणालाच ‘आर्त भक्ती’ असे संबोधले जाते. याच सावळ्या विठ्ठलाच्या आर्त भक्तीने झपाटलेले आणि जगतजेत्या मायबाप विठुरायाच्या दर्शनाची आस असलेले निष्ठावंत वारकरी दरवर्षी आषाढीच्या वारीत मोठ्या भक्तीभावाने सहभागी होत असतात. याच विठुरायाच्या वारीतील काही अविस्मरणीय कथासार मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
मराठी संस्कृतीच्या अस्मितेचे आणि परंपरेचे वैभव असलेल्या विठुरायाच्या या वारीत एक नव्वद-पंच्याण्णव वर्षांचे आजोबा सहभागी झाले होते. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता ते आजोबा पांडुरंगाच्या भेटीसाठी वारीत लगबगीने चालत असताना अचानक त्यांच्या पायातील चप्पल तुटले. त्या आजोबांनी आजूबाजूला पाहत ते तुटलेले चप्पल हातात उचलून घेतले आणि वारीतील अविरत प्रवास मुखी विठ्ठलाच्या नामाचा गजर करत सुरू ठेवला. थोड्या अंतरावर गेल्यावर ते दृश्य पाहून एक अपंग मोची स्वतःला सावरत त्या वयोवृद्ध वारकरी आजोबांकडे आला आणि आपुलकीने त्यांची विचारपूस करत त्याने त्यांचे तुटलेले चप्पल शिवून दिले. त्यावेळी त्या वयोवृद्ध वारकरी आजोबांनी त्या मोच्याचे आभार मानत त्याला विचारले, “तुझे किती पैसे झाले?” त्यावर तो अपंग मोची म्हणाला, “माऊली, मला पैसे मुळीच नकोत. ही वारीतील मी केलेली माझ्या पांडुरंगाची सेवा आहे. त्या सेवेचे फळ माझ्या खात्यावर नक्कीच जमा होईल. आणि पुढच्या जन्मी माझा पांडुरंग मला माझे दोन्ही पाय पुन्हा उपलब्ध करून देईल. मी स्वतःच्या पायांनी या वारीत सहभागी होऊन साक्षात माझ्या पांडुरंगाचे दर्शन घेईन. हा मला विश्वास आहे.” हा जिवंत साक्षात्कार अनुभवल्यानंतर ते वयोवृद्ध वारकरी आजोबा त्या मोच्याला सांगू लागले, “मी संत युगातील अपंग संत कुर्मदासाला प्रत्यक्ष पाहिले नाही रे कधी, पण पोथी-पुराणात त्याच्याबद्दल निश्चितच वाचले आहे. ती संत कुर्मदासाची आर्त भक्ती मी आज तुझ्या रूपात याचि देही, याचि डोळा अनुभवली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवंत समजतो.” एवढे सांगून ते वयोवृद्ध आजोबा त्या मोच्याला म्हणाले, “मी निश्चितच पंढरपूरला गेल्यावर प्रत्यक्ष पांडुरंगाला भेटेन, माझ्या पांडुरंगाला डोळे भरून पाहीन आणि तुला सशक्त शरीर प्राप्त व्हावे अशी विठुरायाकडे मनःपूर्वक प्रार्थना सुद्धा करेन.” काही नास्तिक लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास नसतो, पण त्या अपंग मोच्याचा मात्र पुनर्जन्मावर प्रचंड विश्वास होता. कारण त्या अपंग मोच्याने पुनर्जन्म प्राप्त झालेल्या सकल संतांच्या गाथा वाचल्या होत्या हे त्याच्या आत्मविश्वासावरून प्रकर्षाने जाणवले.
वारीत जसे लुळे-पांगळे वारकरी सहभागी होतात, तसे ज्यांना दुर्दैवाने अंधत्व प्राप्त झाले आहे असे काही अंध वारकरीसुद्धा विठुरायावर आपला सगळा भार टाकून वारीत सहभागी होतात. असाच एक दुर्दैवाने अंधत्व प्राप्त झालेला अंध वारकरी या विठुरायाच्या भक्तीपूर्ण वारीत सहभागी झाला होता. टाळ-मृदंगाचा लयबद्ध ठेका आणि चराचराला व्यापून गगनाचा वेध घेणारा विठ्ठलनामाचा जयघोष त्या वारकऱ्याला दृष्टी नसतानाही वारीत लगबगीने चालण्यासाठी क्षणाक्षणाला प्रेरित करत होता. त्या अंध वारकऱ्याला पाहून वारीत सहभागी झालेले काही जण कुतूहलाने त्याला विचारू लागले, “अहो माऊली, तुम्हाला तर दोन्ही डोळे नाहीत, मग सांगा हो माऊली आम्हाला, पंढरपूरला गेल्यानंतर तुम्ही विठ्ठलाचे दर्शन कसे काय घेणार?” त्यावर तो अंध वारकरी त्यांना सांगू लागला, “माऊली, मला तुमच्या म्हणण्याप्रमाणे दोन्ही डोळे नाहीत हो, म्हणूनच तर मला या विश्वाच्या सारीपाटावर ‘आंधळा’ या परिभाषेने संबोधले जाते. पण ज्या माझ्या विठुरायाची मी आर्त भक्ती करतो आहे ना, त्या माझ्या सख्या विठुरायाला तर दोन्ही डोळे आहेत की हो! त्या दोन्ही डोळ्यांनी माझा विठुराया मला डोळे भरून पाहीलच की हो, कारण त्याबद्दल मला दृढ आत्मविश्वास आहे. मी त्या विठुरायाची आर्त भक्ती करतो. माझा कर्ता-करविता माझा पांडुरंग परमात्मा आहे.” त्या अंध वारकऱ्याचा आर्त भक्तीचा दृष्टिकोन पाहून प्रश्न विचारणारे ते सर्व वारकरी क्षणार्धात त्या अंध वारकऱ्याच्या चरणांवर नतमस्तक झाले. त्यानंतर तो अंध वारकरी पुन्हा टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर विठ्ठलनामाचा गजर करत पुढच्या प्रवासाला निघून गेला. आणि निघताना त्याच्या मुखातून नकळत वाघेश्वरी बाहेर पडली, “पापाची वासना न पाहे डोळा, त्याहूनि आंधळा बराच मी; निंदेचे श्रवण नको माझे कानी, त्याहूनि बहिरा बराच मी; नको मज कधी परस्त्री संगती, स्वच्छ चारित्र्याचा अलंकार मिरवितो मी…” या शब्दकोटीतून त्या अंध वारकऱ्याचे हृदय किती शुद्ध आणि पवित्र अशा आर्त भक्तीने ओतप्रोत भरलेले आहे याचा अंदाज वारीत सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांना आला.
वारीत आरोग्य सुविधा पुरवणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी सुद्धा अविरत कार्यरत होते. त्या आरोग्य पथकाचे नेतृत्व जो डॉक्टर करत होता तो धर्माने हिंदू होता. काही वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या आतंकवादी हल्ल्यात त्या डॉक्टरच्या परिवारातील काही सदस्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. फक्त डॉक्टर, त्याची बायको आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा त्या हल्ल्यातून दैव बलवत्तर म्हणून वाचले होते. प्राण वाचवण्याच्या धावपळीत त्या डॉक्टर दाम्पत्याची आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाची दुर्दैवाने ताटातूट झाली होती. केवळ विठ्ठलनामाने त्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती त्या डॉक्टर दाम्पत्याला प्राप्त झाली होती. म्हणूनच तर तो डॉक्टर प्रतिवर्षी आपल्या सहकाऱ्यांसहीत वारीत निःस्वार्थ आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सज्ज असायचा. वारी रंगात आलेली असताना एके दिवशी एक मुस्लिम वारकरी आपल्या आठ-नऊ वर्षांच्या मुलाला खांद्यावर घेऊन वारीत आरोग्यसेवा पुरवणाऱ्या त्या डॉक्टरपाशी आला आणि तो त्या डॉक्टरला सांगू लागला, “डॉक्टर साहब, डॉक्टर साहब, देखो ना मेरे लड़के को बहुत बुखार आया है। आप तुरंत मेरे लड़के के ऊपर इलाज करो।” त्या मुस्लिम वारकऱ्याच्या कडेवरील तो निरागस, गोंडस मुलगा पाहून त्या डॉक्टरच्या डोळ्यासमोर काश्मीरमध्ये आपल्या परिवारावर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग जशास तसा उभा राहिला. आणि त्या डॉक्टरच्या मनात विचार आला, ‘आपला मुलगा आज असता तर त्याचे वय ह्या मुलाएवढेच असते.’ त्या डॉक्टरचे वात्सल्य जागृत झाले आणि क्षणार्धात त्या डॉक्टरचे डोळे पाणावले. पण डॉक्टरने स्वतःला सावरत कर्तव्य श्रेष्ठ मानून त्या मुलावर योग्य ते औषधोपचार सुरू केले व विश्रांतीसाठी जागाही उपलब्ध करून दिली. थोड्या वेळाने त्या मुलाच्या अंगातील ताप पूर्णतः उतरल्यावर तो मुलगा चुणचुणीत बोलू लागला. त्यानंतर त्या डॉक्टरने त्या मुस्लिम वारकऱ्याला विचारले, “आपण कुठून आला आहात?” त्यावेळी त्या मुस्लिम वारकऱ्याने आपले राहण्याचे वस्तीस्थान निदर्शनास आणून दिले. गप्पा रंगात आलेल्या असताना डॉक्टरने त्या मुस्लिम वारकऱ्याला विचारले, “तुम्ही दोघेच वारीत सहभागी झाला आहात का? परिवार कुठे आहे तुमचा?” त्यावरती त्या मुस्लिम वारकऱ्याने त्या डॉक्टरला सांगितले, “डॉक्टर साहब, मेरी शादी अभी तक हुई नहीं है।” हे ऐकून आश्चर्यचकित झालेल्या त्या डॉक्टरने त्या मुस्लिम वारकऱ्याला विचारले, “ओ भाईजान, आप कह रहे हैं आपकी शादी हुई नहीं है, फिर ये लड़का किसका है?” त्यावरती तो मुस्लिम वारकरी डॉक्टरला सांगू लागला, “मैं कहीं साल पहले मेरे दोस्तों के साथ कश्मीर घूमने गया था। तभी पाकिस्तानी आतंकवादियों ने अचानक उस जगह हमला किया था। उस हमले में एक हिंदू परिवार के कहीं सदस्यों की मौत हुई थी। मैंने वो हादसा मेरे आँखों के सामने देखा था। उस हादसे में उस हिंदू परिवार का सिर्फ दो-तीन साल का एक लड़का जिंदा रह गया था। मैं उस लड़के को गोद में उठाकर मेरे घर ले आया और मेरे माँ-बाप ने उस लड़के का पालन-पोषण किया। आज ये लड़का दस-बारा साल का हो चुका है।”
त्या मुस्लिम वारकऱ्याने सांगितलेला जशास तसा काश्मीरमधील तो प्रसंग ऐकून डॉक्टरच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि क्षणार्धात त्या डॉक्टरच्या मुखातून वाघेश्वरी बाहेर पडली, “भाईजान, भाईजान! कश्मीर में जिस हिंदू परिवार के ऊपर हादसा हुआ था ना, वो मेरा ही परिवार था। उस हादसे में मेरे परिवार के कई सदस्यों की मौत हुई थी लेकिन उस हादसे से मैं और मेरी बीवी और हमारा दो साल का बेटा जिंदा रहा था। उस हादसे के वक्त बहुत भीड़ थी। सब डर के मारे भाग रहे थे। उस भागाभागी के चक्कर में हमारा बेटा किधर गुम हो गया वो हमें पता ही नहीं चला। हमने हमारे लड़के को बहुत ढूँढा। पुलिस ने भी बहुत कोशिश की लेकिन हमारा बेटा हमें वापस मिला ही नहीं। भाईजान, भाईजान, इस लड़के के पेट के ऊपर लाल रंग की लकीर (मराठीत जन्मखूण) है क्या देखो.” हे ऐकून तो मुस्लिम वारकरी म्हणाला, “डॉक्टर साहब, डॉक्टर साहब! देखने की क्या जरुरत है, आपने जिस लाल रंग की लकीर की जिक्र की वो लाल रंग की लकीर इस लड़के के पेट के ऊपर सच है। और वो लकीर डॉक्टर साहब आप सच बोल रहे हैं उसका सबूत मुझे दे रही है। डॉक्टर साहब, डॉक्टर साहब, मैं सच बोल रहा हूँ ये लड़का मेरा नहीं है, ये लड़का आपका ही है। मैं इसी वक्त यहाँ पर अल्लाह को और विठ्ठल भगवान को साक्षी रखते हुए आपके लड़के को आपके पास आज ही सुपुर्द करता हूँ।” आणि त्या मुस्लिम वारकऱ्याने साश्रू नयनांनी तो मुलगा त्या डॉक्टरला सुपुर्द केला. डॉक्टरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण त्या डॉक्टरला सेवाभावी वृत्तीने प्रतिवर्षी वारीत पुरवलेल्या आरोग्य सेवेचे फळ विठ्ठलाने मुलाच्या रूपात व्याजासकट प्राप्त करून दिले होते. हर्षभरीत झालेल्या त्या डॉक्टरने मागचा-पुढचा विचार न करता त्या मुस्लिम वारकऱ्याला हृदयाशी कवटाळले. वारीतील हा सुखद साक्षात्कार हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि माणुसकीचे प्रतीक दर्शवणारा ठरला.
विठ्ठल नामात केवढे सामर्थ्य आहे हो! म्हणूनच तर त्याच्या नामघोषात प्रतिवर्षी रंगात आलेल्या वारीत दुरावलेली नाती एकत्रित येतात, नवीन नाती जोडली जातात, दुःखाचा विसर पडतो आणि सुखाची चाहूल लागते. म्हणूनच तर सकल संत अभंग रूपातून सांगून गेले आहेत की, “पंढरीची वारी करेल जो कोणी त्याच्या मागे पुढे चक्रपाणी.”
आषाढी वारीच्या आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! राम कृष्ण हरी!