वाळूच्या बाबतीत तडी, अंमली पदार्थांच्या बाबतीत दडी; प्रशासनाचा अजब कारभार

✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/प्रतिबिंब

कोकण… कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अथांग पसरलेला निळाशार समुद्र, आकाशाला आलिंगन देणारे उंचच उंच डोंगर, आणि कडे – कपाऱ्यांमधून वाहणाऱ्या नद्या. या प्राकृतिक सौंदर्यामुळेच की काय ? देशातील पहिला पर्यटन जिल्हा बनण्याचा बहुमान आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. पर्यटनासाठी आपला जिल्हा देशभरात प्रसिद्ध आहे. ही बाब प्रत्येक जिल्हावासियासाठी अभिमानास्पद आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्हा हा अंमली पदार्थांचा अड्डा म्हणून ओळखला जात आहे. ही बाब जिल्हावासियांसाठी तेवढीच खेदाची आहे. जिल्ह्याच्या होणाऱ्या या बदनामीला नेमकं जबाबदार कोण ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आपल्या जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शिक्षणाच्या मानाने नोकऱ्या उपलब्ध नाहीत. शेती करायचं म्हटलं तर शेतमालाला हमीभाव नाही. शिवाय खते, बियाणी, फवारणी, मजुरी इत्यादींमुळे होणारा उत्पादन खर्च हा मिळकती पेक्षा जास्तच येतो. याच्या व्यतिरिक्त अवकाळी, महापूर, वन्यप्राण्यांचा उपद्रव ही नैसर्गिक संकटे तर आहेतच. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं तर व्यवसायाला मंजुरी देण्यापूर्वी सतराशे साठ कागदपत्रे मागितली जातात. अनेकदा तर हे प्रस्ताव रद्द देखील होतात. एखादी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीची बारकाईने तपासणी केली जाते. परंतु कुडाळ तालुक्यातील पिंगुळीसारख्या गावामध्ये प्रशासनाच्या नाकाखालून ड्रग्स व गांजा यांसारख्या अंमली पदार्थांची तस्करी होत असेल तर याला नेमकं काय म्हणावं ?

अवैध दारू वाहतूक, अवैध गुटखा, अवैध वाळू उत्खनन यांच्यामागे तर प्रशासन अक्षरशः आसूड घेऊन उभे असते. वृत्तपत्रांमध्ये तर अमुक ठिकाणी अवैध दारू पकडली, तमुक ठिकाणी बेकायदा वाळूचे रॅम्प उद्ध्वस्त केले अशा प्रकारच्या बातम्या दर दिवसाआड झळकत असतात. या गोष्टींचे श्रेय प्रशासन जेवढ्या अभिमानाने घेते तेवढ्याच जबाबदारीने अंमली पदार्थांच्या होणाऱ्या तस्करीचे श्रेय घेणार का ? असा सवाल सर्वसामान्य माणसांमधून उपस्थित होऊ लागला आहे.

सिंधुदुर्ग पोलिसांचे तर जिल्हाभरात फार मोठे नेटवर्क आहे. खून, चोरी इत्यादी गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी अगदी काही तासात लावला आहे. याबाबत सिंधुदुर्ग पोलिसांचे तर कौतुकच करावे लागेल. अवैध दारू, अवैध गुटखा, अवैध वाळू यांची खबर तर पोलिसांना आधीच मिळते. पोलिसांचे खबरी जणू यांच्यामागे ‘ सर्चलाईट ‘ घेऊनच उभे असतात. मग अंमली पदार्थांच्या तस्करीसारख्या संवेदनशील विषयाच्या बाबतीत ही ‘ सर्चलाईट ‘ कशी बंद पडली ? असा प्रश्न मनाला पडल्याशिवाय राहत नाही.

कोकणी माणूस हा फार भोळा आहे. दिवसभर कष्ट करून मिळवलेल्या भाकरीतून रात्री पोटाची खळगी भरणे. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उठून त्याच भाकरीसाठी दिवसभर कष्ट करणे हा कोकणी माणसाचा नित्यक्रम. “येवा कोकण आपलाच आसा ” म्हणत ही माणसं आपल्या मनाचे व कोकणचे दरवाजे सर्वांसाठीच खुले ठेवतात. कोकणी माणसाच्या याच स्वभावाचा फायदा परप्रांतीय घेतात. अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सापडलेला संशयित परवेज आली खान हा मूळचा उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे. ज्याच्यामुळे कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव देशस्तरावर बदनाम झाले आहे. असे अनेक परवेज आजही सिंधुदुर्गात खुलेआम वावरत आहेत. महाभारतातील कर्णाप्रमाणे त्यांना प्रशासनाकडून ‘कवचकुंडले ‘ मिळाली आहेत की काय ? असा प्रश्न पडतो आहे.

या सर्व परप्रांतीय कामगारांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुडाळ पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केला होता. या आरोपांना उत्तर देताना कुडाळचे पोलीस निरीक्षकांनी म्हटले की, या सर्व परप्रांतीय कामगारांची सखोल चौकशी करण्यात आली असून यातील ८० % कामगारांची पूर्ण माहिती आपल्याकडे आहे. मग उर्वरित २० % कामगारांकडून कोणी दुसरा परवेज निघाला तर…? अशी भीती व्यक्त होत आहे

ड्रग्स, गांजा यांसारख्या अंमली पदार्थांना तरुण पिढी बळी पडून बरबाद होत आहे. हीच पिढी देशाचं भविष्य आहे. ड्रग्स या ‘सफेद ‘ रंगाच्या पावडरमुळे देशाच्या भविष्याचा रंग ‘काळसर ‘ होऊ शकतो. जगभरातील अनेक शत्रू आपल्या भारताचे भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी याच ‘सफेद पावडरच्या ‘ माध्यमातून आपले ‘काळे इरादे ‘ प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आपण देखील आपल्या मजबूत इराद्याने या सर्वांचे प्रयत्न हाणून पाडत देशाला महासत्ता बनण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हे केवळ आपल्या हातात आहे.

error: Content is protected !!