✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/ प्रतिबिंब
कोकण… परमेश्वर नावाच्या कलाकाराच्या हातून साकारला गेलेला अद्भुत असा कलाविष्कार. कोकणाला साकारताना बहुरंगी छटांनी रंगवले गेले आहे. कदाचित परमेश्वराने दिलवाले चित्रपटातील गाण्याप्रमाने कोकणाला फुरसतसे बनाया होगा. कोकणातील हा समुद्र, खाड्या, डोंगरदऱ्यांमध्ये असं काहीतरी मौल्यवान दडलंय ज्याचा सुगावा संपूर्ण जगाला लागला आहे. मात्र कोकणी माणूस अद्यापही यापासून अनभिज्ञ आहे.
कोकणातील मुलांना अगदी लहानपणापासूनच शिकवले जाते की, चांगले शिक्षण घे जेणेकरून चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. याचाच परिणाम म्हणून अगदी दहावी, बारावी किंवा ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही मुले नोकरी निमित्त शहराच्या दिशेने वळतात. तिथे तुटपुंज्या पगाराची नोकरी करतात अन् गावाला आले की चाकरमानी म्हणून अभिमानाने मिरवतात. मुंबईत १०×१० ची घर घेणे, पहाटे लवकर उठून लोकल मध्ये धक्के खात ऑफिस गाठणे, ८ तास नोकरी करणे आणि आयुष्यभर कर्ज काढून घेतलेल्या घराचे हफ्ते फेडणे यामध्ये आयुष्य असं काही निघून जाते जसे की, मुठीत पकडलेल्या वाळूचे कण असावे. हल्ली तरुण पिढी नोकरीनिमित्त शहराकडे स्थलांतरीत झाल्यामुळे बारमाही फुलणारी शेती आता ओस पडू लागली आहे. या पडसर जमिनीचा आपणास काय फायदा ? या विचाराने पूर्वजांनी प्राणपणाने राखून ठेवलेली जमीन. जिने आतापर्यंत आपल्या पोटाची खळगी भरली, मागचा पुढचा कसलाही विचार न करता काही पैशांच्या मोहापायी विकली जाते. याचाच फायदा परप्रांतीय लोक घेतात.
आपल्या कोकणाला समुद्राने एका बाजूने पूर्णतः वेढले आहे. ज्या समुद्रातून आपल्याला मासे, मीठ, पर्यटन यांसारख्या विविध गोष्टी मिळतात. म्हणूनच समुद्राला रत्नाकर असे म्हटले जाते. शिवाय मालाची ने – आण करण्यासाठी याच सागरी मार्गाचा उपयोग होऊ शकतो. शिवाय कोकणचा कोकणी मेवा तर जगप्रसिद्ध आहे. फक्त आंबा आणि काजूचे उदाहरण घेतले, तरी जगभरातून हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. हापूस आंब्याचे उत्पादन फक्त कोकणात होते. हाच हापूस आंबा कोकणातून बाहेर पाठवला जातो. पुढे याच हापूस आंब्यावर प्रक्रिया करून मँगो माझा, मँगो स्लाइस, मँगो फ्रूटी असे प्रोडक्ट बनवून पुन्हा आपल्यालाच विकले जातात. अंब्याप्रमाणे काजुला देखील जगभरात मोठी मागणी आहे. या काजुपासून काजूबर्फी सारखे गोड पदार्थ बनवले जातात. आंबा – काजुप्रमाणेच करवंद, चारोळ्या, कोकम अशा कोकणी मेव्याला देखील फार महत्त्व आहे. शिवाय मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकारणामुळे वाहतूक क्षेत्रात फार मोठी क्रांती घडली आहे. नेमकं हेच रहस्य परप्रांतीय लोकांना कळलं असून कोकणी माणूस अजूनही निद्रिस्त आहे. कोकण नावाची सोन्याची अंडी देणारी कोंबडी जर आपल्याला मिळाली ते आपल्या आयुष्याची चांदी होईल हे त्यांना पक्के ठाऊक झाले आहे. काही तुटपुंजी रक्कम घेऊन कोकणी माणूस आपल्याकडील सोन्याची खाण विकून आपल्याच गावी परका होत चालला आहे. मुंबईत आपल्या कोळी बांधवांनी जी चूक केली तीच चूक आज कोकणी माणूस करत आहे.
उद्योजकांप्रमाणेच देशभरातील प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील आज कोकणात प्रॉपर्टी खरेदी करत आहेत. अलीकडेच भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर जमिनीच्या व्यवहारासाठी भोगवे येथे आला होता. तर बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला हिने देखील कोचरा या गावी प्रॉपर्टी खरेदी केल्याचे समोर आले आहे.
मुंबईसारख्या शहरामध्ये स्वतःची कोट्यवधींची प्रॉपर्टी असून कोकणात प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी इंटरेस्ट दाखवत आहेत. म्हणजेच कोकणचे महत्व बाहेरच्या लोकांना कळलंय पण कोकणी माणसाला अद्याप कळलेलं नाही हेच दुर्दैव !
काही दिवसांपूर्वी ठक्कर नामक एका परप्रांतीय व्यक्तीने दाभोली येथील स्थानिकांना मारहाण केल्याची घटना घडली होती. यावेळी परप्रांतीय महिलांकडून स्थानिक महिलांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेविरोधात सर्व कोकणवासीयांनी मतभेद आणि पक्षभेद विसरून एकत्र लढा देणं अपेक्षित होतं. परंतु असं झालं नाही. मालवणी मध्ये एक म्हण आहे “येवाजलेला साधात तर दळीदार कीत्या बाधात” ह्या म्हणीप्रमाणे दळीदार लागण्यापूर्वी सगळ्यांनी एकत्र येवन पावला उचलणा गरजेचा असा. कालपर्यंत मुंबईमध्ये मराठी माणसाला मारहाण झाल्याच्या घटना कानावर येत होत्या. आता अशा घटना कोकणात देखील घडू लागल्या आहेत. यांना वेळीच आवर घालणं गरजेचं आहे. अन्यथा हे ‘परप्रांतीय बकासुर’ मुंबईप्रमाणेच कोकण ‘गिळंकृत’ केल्याशिवाय राहणार नाहीत.
अल्लू अर्जुनाच्या पुष्पा या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे लाल चंदन हे जगात फक्त दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येच आढळते. ही बाब अल्लु अर्जुन याने सर्वांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात लाल चंदनाची किंमत किती आहे हे सर्वांना समजले. त्याचप्रमाणे हापूस, काजू, जांभूळ, करवंद, कोकम, फणस यांचे उत्पादन देखील कोकणातच होते. आपण देखील याच गोष्टीचा फायदा घेऊन अधिकाधिक आर्थिक नफा आपल्याला कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा चांगले शिक्षण म्हणजे चांगली नोकरी ही समज कोकणातून कायमची हद्दपार होईल.
आज व्यवसायानिमित्त अनेक परप्रांतीय मुंबईप्रमाणेच आता कोकणच्या दिशेने सरकत आहेत. या परप्रांतीय बकासुरांच्या घशात कोकण कायमचे जाण्यापूर्वी लवकर परत येवा. येवा, कोकण आपलाच आसा !