बॅ. नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील धान्य घोटाळ्याशी संबंधित तत्कालीन स्कूल कमिटी अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर व अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा

सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांची कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

कुडाळ : बॅ. नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील धान्य घोटाळ्याशी संबंधित संस्थेचे तत्कालीन स्कुल कमिटी अध्यक्षांवर तसेच अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांची कुडाळ पोलीस निरीक्षक श्री मगदूम साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की मी अर्जदार वैभव महादेव जाधव, कुडाळ येथील रहिवासी आहे तसेच, संदर्भित प्रकरणामद्धे मुख्य तक्रारदार असून आम्हाला आपल्या पोलीस ठाण्याचे लक्ष बॅ नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील प्रधानमंत्री पोषणशक्ति निर्माण योजना या योजनेमध्ये झालेल्या अपहाराच्या प्रकरणाकडे वेधायचे आहे. या अपहारामध्ये प्रशालेतील गरजू वि‌द्यार्थ्यांच्या हक्काचे धान्य चोरून परस्पर विकत असल्याचा संशय होता. त्याप्रमाणे तत्कालीन मुख्याध्यापक श्री. महादेव अण्णाप्पा सातपुते यांना पोल्ट्री फीड च्या पोत्यांमद्धे भरलेला पोषण आहार बोलेरो पिकप टेम्पोमध्ये भरताना रंगेहात पकडून शिक्षण अधिकारी यांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर शिक्षण अधिकारी यांनी तक्रार दिलेनुसार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. महादेव अण्णाप्पा सातपुते यांच्यावर FIR NO.0264/2023 या क्रमांकाने आपल्या पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल झालेला असून सध्या प्रकरण तपासात आहे.
हे कृत्य गरिब विद्यार्थ्यांच्या हक्कांवर आघात करत असून, सार्वजनिक पोषण आहार योजनेच्या व्यवस्थेचा दुरुपयोग करण्यात आलेला आहे. सदर प्रकरण आम्ही जनहितार्थ उघडकीस आणलेले आहे. परंतु तपास अधिकारी यांनी आमच्या भावना विचारात न घेता या प्रकरणात पोलीस तपास कामामध्ये काही त्रुटी ठेवलेल्या आहेत.
अ) आमची आपल्याला विनंती आहे की प्रथम धान्य निर्लेखनाची प्रक्रिया का केली गेली नाही? याची चौकशी करण्यात यावी.
ब) आमची आपल्याला विनंती आहे की धान्य अपहार करण्यासाठी जे वाहन वापरले होते(MH-07-AJ-1345) ते वाहन अजूनही पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतले नाही. तरी या वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करून वाहन जप्त करावे आणि खालील मुद्द्द्यांच्या आधारे चौकशी करावी.
1) धान्य भरण्यासाठी धान्याचे अधिकृत INVOICE BILL किंवा प्रशालेतील कमिटीची परवानगी होती का?
2) यापूर्वी त्याने किती वेळा असे अनधिकृत धान्य या प्रशालेतून बाहेर नेले आणि कुठे नेले?
3) धान्याची अनधिकृत वाहतूक करण्यासाठी किती रुपये घेतले आणि सोबत कोण सामील होते?
4) त्याचप्रमाणे सदरचे धान्य कोठे नेण्यात येणार होते याची चौकशी व्हावी.
5) धान्य निर्लेखनाचा अहवाल किवा त्यासंदर्भात कागदपत्रे/परवानगी होती का?

या वाहनाचा शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या लेखी तक्रारीमध्ये आम्ही स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे तसेच FIR मध्ये देखील याचा उल्लेख आहे. या टेम्पोमद्धे भरलेले धान्याच्या पोत्यांचे फोटो आणि विडिओ आमच्याकडे आहेत. या निवेदनसोबत तुम्हाला पुरवीत आहोत.
क) आमची मागणी अशी आहे की मुख्याध्यापक श्री. महादेव अण्णाप्पा सातपुते यांना या प्रकरणात प्रशालेचे तत्कालीन स्कूल कमिटी अध्यक्ष श्री राजेंद्र मुंबरकर यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थेच्या स्तरावर चौकशी समिती नेमून या प्रकरणात चौकशी करणे अपेक्षित होते. तसेच संशयित मुख्याध्यापक यांच्या ताब्यातील सर्व रजिस्टर, बँकेचे पासबुक सील बंद करणे आवश्यक होते जेणेकरून संबंधित आरोपीला सदर पुराव्यात ढवळाढवळ करणे किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करता येणार नव्हता. तसेच चौकशी प्रलंबित असलेल्या कालावधीत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे आवश्यक होते परंतु याप्रकारे कोणतेही कारवाई न करता उलट त्यांनी खालील संदर्भाची पत्रे वेगवेगळ्या तारखांना शिक्षण विभागाला पाठवली.
1) धान्यादी माल त्याची विहित मार्गाने निर्लेखन करणे आवश्यक होते. तथापि सदरील प्रक्रियेचे ज्ञान नसल्याने निर्लेखनाची प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. तथापि, दरम्यानच्या कालावधीत सदरील माल मा. गटशिक्षणाधिकारी कुडाळ व पोलिस यंत्रणेने ताब्यात घेतल्याने निर्लेखनाची प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. तरी याप्रकरणी निर्लेखनाबाबत उचित आदेश व मार्गदर्शन मिळणेस विनंती आहे.
2) शाळेला भेट देऊन गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कुडाळ यांनी प्राप्त कागदपत्रांच्या आधारे केलेल्या प्राथमिक चौकशीच्या अहवालामध्ये दर्शविण्यात आलेल्या मालामध्ये तफावत असून ती मान्य करण्यासारखा नाही. सदरील अहवालामध्ये नमूद करण्यात आलेली आकडेवारी जुळणारी नसल्याने यामध्ये तफावत दर्शवून मुख्याध्यापक यांचेकडून वसूल पात्र दर्शविण्यात आलेली रक्कम मान्य करता येत नाही.
3) सदर प्रकरणी प्राथमिक चौकशी अहवालानुसार प्रथम खबरी अहवाल दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सबब वरील बाब न्यायप्रविष्ट असल्याने या प्रकरणी मुख्याध्यापक यांचेवर खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील नियम क्र. 29 नुसार कारवाई करणे नियमानुकूल होणार नाही.

4) सबब सदरील मालाचे विहित पद्धतीने निर्लेखन करणे आवश्यक आहे तथापि सदरील माल मा. गटशिक्षणाधिकारी कुडाळ व पोलिस यंत्रणेने जप्त केलेला असल्याने मालकरणी पुढील कार्यवाही करता येत नाही.
5) उपरोक्त संदर्भ 302 अन्वये याबाबतचा अहवाल सादर करणेत आलेला असून या प्रकरणाची श्री. सातपुते यांचे विरुदध कारवाई करणेची आवश्यक नसल्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. तरी श्री. सातपुते यांचे विरुध्द कारवाई न करण्याचा निर्णय संस्थेने घेतलेला असल्याने त्यांचा सेवानिवृत्ती प्रस्ताव मंजुरीबाबत कार्यवाही होणेस विनंती आहे.
6) सदरील मालाचे विहीत पध्दतीचा अवलंब करून निर्लेखन करणे आवश्यक असल्याने याबाबतीत रक्कम वसूल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
वरील संदर्भित पत्रांनावरून स्कूल कमिटी अध्यक्षांचे कृत्य हे मुख्याध्यापक यांना पाठीशी घलण्यासारखे दिसून येते.
तसेच प्रशालेच्या स्कूल कमिटी अध्यक्ष श्री राजेंद्र मुंबरकर हे शालेय समितीचे अध्यक्ष असताना यांनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून सही करून पत्रव्यवहार केले आहेत आणि मुख्याध्यापक श्री. महादेव अण्णाप्पा सालपुते यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच संस्थेचा खोटा शिक्का वापरलेला आहे असे आमच्या निदर्शनास आलेले आहे. श्री राजेंद्र मुंबरकर यांनी संस्थेचा बनावट शिक्का तयार केला. सदर संस्था ही “महात्मा गांधी लोकसेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश)” अशा नावाने ओळखली जाते. तसेच पुणे येथे नोंदणीकृत आहे. श्री. मुंबरकर यांनी सदरची संस्था “कुडाळ” येथील आहे असे भासविले आहे. शालेय समितीचा अध्यक्ष असताना संस्थेचा अध्यक्ष आहे असे भासवून प्रशासनाशी पत्रव्यवहार करून गैर कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर व्यक्तिमत्वा‌द्वारे फसवणूक करणे (Cheating by Personation) चा गुन्हा दाखल करावा आणि बनावट दस्तऐवज तयार करून गुन्ह्यास मदत केली आहे त्यामुळे त्यांच्यावर फोरजरी अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
तसेच माननीय शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांनी शिक्षण विभागाच्या प्राथमिक चौकशी समितीचा अहवाल मागऊन अहवालाच्या अनुषंगाने मुख्याध्यापक श्री. महादेव अण्णाप्पा सातपुते यांच्यावर कारवाईचे आदेश देऊनही संस्थेने कारवाई न केल्यामुळे माननीय शिक्षणाधिकारी यांनी मा. शिक्षण उपसंचालक यांना पत्र पाठवले होते. यामध्ये सुद्धा श्री. मुंबरकर यांनी मुख्याध्यापक यांना शिक्षण विभागाशी खोटा पत्र व्यवहार करून पाठीशी घातल्याचे आणि गुन्ह्यातील सहभाग दिसून येते. या संदर्भातील पुरावे आम्ही या निवेदनासोबत सादर करीत आहोत.

ड) शिक्षण विभागाने गटशिक्षणाधीकरी आणि अधीक्षक प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना यांची चौकशी समिति नेमल्यानंतर चौकशीअंती खालील निष्कर्ष दिले आहेत
1) श्री. महादेव अण्णाप्पा सातपुते, मुख्याध्यापक बॅ. नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ यांचेकडून प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना या योजनेची अंमलबजावणी योग्य रितीने न कैल्यामुळे शासकिय अनुदानाचा अपव्यय झालेला प्रथमदर्शनी निदर्शनास येतो.
2) श्री. महादेव अण्णाप्पा सातपुते, मुख्याध्यापक बॅ. नाथ पै माध्यमिक वि‌द्यालय कुडाळ यांनी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना या योजनेतील धान्य व धान्यादी मालाचा ताळमेळ न घेता मागणी केल्यामुळे शिल्लक राहिलेले साहित्य विनापरवानगों शाळेमधून बाहेर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पर्यायाने सदर शासकिय साहित्याचा अपव्यय झालेला निदर्शनास येतो.
3) शासकिय योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे केलेली नाही.
हे निष्कर्ष पोलिस यंत्रानेकडून तपासकामामध्ये का लक्षात घेतले जात नाहीत? याचीही चौकशी व्हावी. या निवेदनसोबत याची प्रत जोडत आहोत.
इ) तसेच प्राथमिक पंचयादीत “धान्यसाठा खोलीच्या बाहेरील मुद्देमाल व धान्यसाठा खोलीतील धान्य वस्तु यांची पाहणी केली असता दोन्ही धान्यसाठा चांगल्या स्थितीत आढळून आला” अशी पंचनाम्यामध्ये नोंद असून त्यावर स्वतः मुख्याध्यापक श्री. महादेव अण्णाप्पा सातपुते यांची सही आहे. मग धान्य खराब कसे? याचीही चौकशी व्हावी. सोबत प्रत जोडत आहोत.
ई) तसेच तपास अधिकारी यांनी मुख्य तक्रारदार, प्रत्यक्षदर्शी, उपस्थित सर्व पंच यांचे जबाब अजून घेतले नाहीत. त्यांचे जनाब शक्य तितक्या लवकर घेण्यात यावेत.
या प्रकरणातील दोषर्षीवर कायदेशीर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपण या प्रकरणाचा सखोल तपास करून, संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. अशी आमची विनंती आहे.
घोटाळ्यातील संशयितांची शक्यतो माहितीः

  1. सौ. देवयानी रणसिंग, वाहन मालक
  2. श्री. दत्तराज रणसिंग, वाहन चालक (घटनास्थळी उपस्थित)
  3. श्री. राजेंद्र मुंबरकर, तत्कालीन स्कूल कमिटी अध्यक्ष
    तसेच. आम्ही या प्रकरणात आवश्यक सहकार्य करण्यास तयार आहोत आणि तपास प्रक्रियेसाठी संबंधित पुरावे उपलब्ध करून देण्यास इच्छुक आहोत. आपण या निवेदनाचा विचार करून, लवकरात लवकर योग्य ती कारवाई कराल, अशी आशा आहे.
    अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री.वैभव जाधव यांनी कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.मगदुम साहेब यांच्याकडे केली आहे.आता पोलिस प्रशासन यावर कोणती कारवाई करते आणि संपूर्ण केसच्या तपासात काय निष्पन्न होते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
error: Content is protected !!