
बालगोपाळांसोबत आमदार जठार यांचा उत्स्फूर्त सहभाग; भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
“भगवान श्रीकृष्ण हे आजच्या युवा पिढीचे मोटिवेशनल गुरु” – आमदार प्रमोद जठार
राजापूर : भारतीय जनता पार्टी राजापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाला आमदार प्रमोद जठार यांच्या दमदार उपस्थितीने उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. बालगोपाळांसोबत थेट दहीहंडीच्या मैदानात उतरलेल्या आमदार जठार यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
यावेळी भारतीय जनता पार्टी राजापूरच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा उत्स्फूर्तपणे सन्मान करण्यात आला. उपस्थित बालगोपाळ, गोविंदा पथके आणि दहीहंडीप्रेमींना मार्गदर्शन करताना आमदार जठार यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरा जपण्याचे आवाहन केले.
“सुमारे पाच हजार वर्षांपासून चालत आलेली ही संस्कृती आणि परंपरा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. भगवान श्रीकृष्ण हे केवळ देव नाहीत, तर आजच्या युवा पिढीचे मोटिवेशनल गुरु आहेत. संघर्षातून मार्ग काढण्याची, संकटांवर मात करण्याची आणि योग्य नेतृत्व करण्याची प्रेरणा श्रीकृष्णाच्या जीवनातून मिळते,” असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी केले.
दहीहंडीच्या निमित्ताने राजापूरमध्ये भाजपच्या संघटनशक्तीचे आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे जोरदार दर्शन घडले. पारंपरिक उत्सवाला आधुनिक विचारांची जोड देत भाजपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमस्थळी “गोविंदा आला रे!”च्या घोषणांसोबत भाजप कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला. बालगोपाळांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उत्सवाचा आनंद घेतला.
यावेळी भारतीय जनता पार्टी राजापूरचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख, कार्यकर्ते, गोविंदा पथके, दहीहंडीप्रेमी नागरिक आणि बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Subscribe








