कुडाळ :पॉक्सोच्या गंभीर गुन्ह्यातील २२ वर्षीय आरोपीस जामीन मंजूर

अॅड सुहास सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद

कुडाळ : दोडामार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पॉक्सो काय‌द्यांतर्गत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी बिरबल ऊर्फ राजेश बिस्वजीत शिल (वय २२) यास न्यायालयाने कठोर अटी व शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणातील आरोपी ११ जून २०२६ पासून न्यायालयीन कोठडीत होता. आरोपीच्या जामीन अर्जास तपास अधिकारी, सरकारी पक्ष तसेच पीडितेच्या वतीने विरोध करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य, पीडिता अल्पवयीन असल्याने आरोपीकडून साक्षीदारांवर दबाव येण्याची अथवा पुराव्याशी छेडछाड होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद विरोधी पक्षाकडून करण्यात आला. मात्र, आरोपीच्या वतीने अॅड सुहास सावंत यांनी युक्तिवाद केला की, प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपीची पुढील कोठडीतील चौकशी आवश्यक नाही. तसेच आरोपीचा कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. आरोपीच्या वतीने पीडिता, तिचे पालक व इतर साक्षीदारांच्या जबाबांमध्ये कथित विसंगती असल्याचा मु‌द्दा उपस्थित करण्यात आला. तसेच प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल, मोबाईल चॅटचा पुरावा तसेच आरोपीकडून कोणतीही जप्ती नसल्याचे बचाव पक्षातर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून पीडिता अल्पवयीन असल्याची बाब निश्चितच महत्त्वाची असल्याचे नमूद केले. मात्र, केवळ आरोपांचे गांभीर्य हे जामीन नाकारण्याचे एकमेव कारण असू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंद‌विले. जामीन अर्जाच्या टप्प्यावर पुराव्यांचे सविस्तर मूल्यमापन करून आरोपी दोषी अथवा निर्दोष असल्याचा निष्कर्ष काढणे अपेक्षित नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तपास पूर्ण होणे, आरोपपत्र दाखल होणे आणि आरोपीच्या पुढील कोठडीतील चौकशीची आवश्यकता नसणे या बार्बीचाही विचार करण्यात आला. तसेच आरोपीकडून पीडिता किंवा साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता कठोर अटी घालून रोखता येऊ शकते, असे न्यायालयाने नमूद केले.

या सर्व परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने आरोपी बिरबल ऊर्फ राजेश बिस्वजीत शिल याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. आरोपीस ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच त्याच रकमेच्या एका सक्षम जामीनदारावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपीच्या जामीन अर्जासाठी अॅड. सुहास सावंत, अॅड. सोनू गातस, अॅड. लिलांगी सावंत, अॅड. उमा सावंत, अॅड. रसिका सावंत, अॅड. संदेश कोएगातकर व अॅड. धनश्री लैंबुलकर यांनी बाजू मांडली. बचाव पक्षातर्फे करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीस अटी व शर्तीसह जामीन मंजूर केला.

error: Content is protected !!