
वेताळ बांबर्डेच्या जय वेतोबा गोविंदा पथकाने फोडली हंडी
सामाजिक संदेश, महिलांचे युद्धकौशल्य, नृत्याविष्कार आणि विविध उपक्रमांनी दहीहंडी उत्सव ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
पिंगुळी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साई कला मंच पिंगुळी सखे सोबती मित्रमंडळ आणि सिद्धिविनायक मित्रमंडळ पिंगुळी यांच्या मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सव उत्साह, जल्लोष आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला. पारंपरिक दहीहंडीबरोबरच विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची मेजवानी मिळाल्याने यंदाचा उत्सव विशेष चर्चेचा विषय ठरला.
दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या जय वेतोबा गोविंदा पथक, वेताळ-बांबर्डे यांनी थरावर थर रचत अखेर हंडी फोडून उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला. त्यांच्या दमदार सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
उत्सवाचे आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते कणकवलीतील महिलांचे लाठी-काठी व युद्धकौशल्याचे थरारक सादरीकरण. महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक युद्धकलेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. महिलांसाठी डोळ्यांवर पट्टी बांधून काठीच्या साहाय्याने मडके फोडण्याचा मनोरंजक खेळही घेण्यात आला.
यासोबतच पी. के. अकॅडमी कुडाळ, चिमणी पाखरू डान्स अकॅडमी तसेच पिंगुळीतील बालकलाकारांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली. लहान मुलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश
जय वेतोबा गोविंदा पथक, वेताळ-बांबर्डे यांनी सादर केलेला समाजप्रबोधनपर देखावा हा उत्सवाचा विशेष ठरला. सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या या देखाव्यातून उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घालणारा संदेश देण्यात आला. मनोरंजनासोबत समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा मंडळाचा प्रयत्न उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरला.
पारंपरिक उत्सवातून एकजुटीचा संदेश
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना पारंपरिक सण-उत्सव सर्वांनी एकत्र येऊन साजरे करण्याचे आवाहन केले. दहीहंडीबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कुडाळ पोलीस निरीक्षक बडवे साहेब.यांनी दहीहंडी उत्सवात सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरे करताना कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
गावच्या सुपुत्राचा सत्कार; भावुक झाले सचिन दाभोलकर
मुंबई पोलीस निरीक्षक आणि पिंगुळी गावचे सुपुत्र सचिन दाभोलकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. गावातील सत्काराचा क्षण त्यांच्यासाठी भावनिक ठरला. मुंबईत बंदोबस्ताची जबाबदारी असतानाही गावच्या कार्यक्रमासाठी सुटी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी आपल्या शिक्षणाच्या आठवणींना उजाळा दिला.
“माझे शिक्षण कुडाळमध्ये झाले. आपल्या गावात माझा सत्कार होत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाची बाब आहे,” असे सांगताना दाभोलकर भावुक झाले.
सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई यांनी सखे सोबती मित्र मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. गेल्या चार वर्षांपासून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, उत्सवासोबतच प्लास्टिकबंदी जनजागृती, रक्तदान शिबिर, रुग्णवाहिका सेवा यांसारखे सामाजिक उपक्रम मंडळाकडून राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्यसेवेसाठी स्ट्रेचर, खुर्च्या व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी रुग्णवाहिका सेवेच्या वाहनाची पाहणी केली.
आमदारांच्या वतीने २५ हजारांची मदत
कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वतीने सखे सोबती मित्र मंडळाला २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवळकर यांनीही मंडळाला ५ हजार रुपयांची मदत दिली.
यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवळकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवळकर, युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, नगरसेवक नयना मांजरेकर आणि युवा तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी उत्सवाला भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या. तसेच ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश घाट सुशोभीकरणाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला पिंगुळी ग्रामपंचायतीचे सरपंच अजय आकेरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णा रनसिंग, कुडाळ न्यायालयातील सरकारी वकील गौरव पडते, मुंबई पोलीस निरीक्षक सचिन दाभोलकर, पंचायत समिती सदस्य ममता राऊळ, अभय सामंत, राजा पांचाळ, भूषण तेजम, दशरथ राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कुडाळ पोलीस निरीक्षक बडवे साहेब,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर, डॉक्टर पालयेकर मॅडम यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अमित तेंडोलकर, दीपक गावडे,मंगेश चव्हाण,सिद्धेश मोंनडकर, बाबल गावडे,वैभव धुरी, वैभव दाभोलकर, सतीश माडये संग्राम खानोलकर,दर्शन कुडव,तेजस प्रभू, प्रणव प्रभू संदीप परब,सचिन सावंत, समीर मयेकर,विजय तुड्येकर,प्रणव हर्ष कुडव, पुरळकर,राज वारंग, मयूर लाड,समीर मालकर, शिवा राणे,सचिन शंबडकर, अजय बांदेकर,सचिन सातार्डेकर,सिद्धेश माणगावकर,संदीप गावडे,तन्मय वालावलकर, महेश राऊळ मित्र मंडळ, तसेच सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अमित तेंडोलकर व तांबे सर यांनी कार्यक्रमाचे समालोचन केले, तर दीपक गावडे यांनी आभार मानले.
सामाजिक संदेश, संस्कृती, कला, मनोरंजन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा पिंगुळीतील दहीहंडी उत्सव यंदा अविस्मरणीय ठरला.



Subscribe








