
ना हरकत दाखल्यासाठी चांदीच्या अंगठीची मागणी
कुडाळ : व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ (NOC) देण्यासाठी १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून स्वीकारणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक संशयित पांडुरंग वासुदेव नाटेकर (वर्ग ३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
४२ वर्षीय तक्रारदाराने ‘पदमगड ज्वेलर्स’ नावाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नगरपंचायतीत अर्ज केला होता. हा दाखला देण्याच्या मोबदल्यात स्वच्छता निरीक्षक संशयित नाटेकर यांनी १,२०० रुपये किमतीची नवीन खडा असलेली चांदीची अंगठी मागितली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर २७ ऑगस्ट २०२६ रोजी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत संशयित नाटेकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता नगरपंचायत कार्यालयात रचलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून अंगठी स्वीकारताच आरोपीला संशय आला. वस्तूची मागणी केल्यानंतर संशय आल्याने संशयित नाटेकर यांनी प्रतिसाद देणे थांबवले. मात्र, एसीबी पथकाच्या शिताफीच्या कारवाईने आरोपीला रंगे हात पकडण्यात यश मिळवले.
आरोपीला वस्तू देताच खुणा करण्याची सूचना दिली होती. ते संकेत मिळताच एसीबी पथक दाखल झाले. संशयिताने स्वतःला वाचवण्यासाठी अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातावर अँथ्रोसिन पावडर स्पष्ट दिसून आल्याने पथकाने संशयिताला तत्काळ ताब्यात घेतले. संशयित पांडुरंग नाटेकर यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम ७ सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २३८ (पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटच्या पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक माळी आणि त्यांच्या पथकाने केली.



Subscribe










