निलेश राणेंच्या शिलेदारावर मोठी जबाबदारी

राणेंच्या विश्वासाची मोहर, वाळकेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

स्वरूप वाळके यांची युवासेना जिल्हाप्रमुखपदी वर्णी

सिंधुदुर्ग : युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत आमदार निलेश राणे यांनी स्वरूप वाळके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची युवासेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे युवासेनेच्या जिल्ह्यातील संघटनेला नवे नेतृत्व आणि अधिक आक्रमक चेहरा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत सामाजिक उपक्रम, जनतेचे प्रश्न आणि संघटनात्मक कामात सक्रिय असलेल्या स्वरूप वाळके यांच्यावर आता संपूर्ण जिल्ह्यात युवासेनेची संघटनात्मक ताकद उभी करण्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

निलेश राणेंच्या विश्वासाला वाळकेंची साथ

पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य वेळी जबाबदारी देत त्याच्यावर विश्वास दाखवण्याची भूमिका आमदार निलेश राणे यांनी कायम ठेवली आहे. त्याच विश्वासातून स्वरूप वाळके यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे मानले जात आहे.

ही केवळ पदाची नियुक्ती नसून नेतृत्वावर टाकलेली विश्वासाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे आगामी काळात युवासेनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना संघटित करून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान स्वरूप वाळके यांच्यासमोर असणार आहे.

युवासेनेच्या संघटनेला मिळणार नवी धार

जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि बूथ पातळीवर युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर देण्याचा निर्धार स्वरूप वाळके यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. युवकांचे प्रश्न, स्थानिक समस्या, सामाजिक उपक्रम आणि जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आवाज उठवणारी युवासेना उभी करण्याचा संकल्प या नियुक्तीच्या निमित्ताने व्यक्त होत आहे.

युवासेनेतील युवा कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांना संघटनेत सक्रिय संधी देणे, नव्या चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी उपलब्ध करून देणे आणि जिल्ह्यात संघटनेची मजबूत फळी उभी करणे, हे आगामी काळातील प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

निलेश साहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. पद मिळाले म्हणून थांबायचे नाही, तर या विश्वासाला कामातून उत्तर द्यायचे आहे. जिल्ह्यातील प्रत्येक युवा कार्यकर्त्याला सोबत घेऊन युवासेना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार, असा निर्धार स्वरूप वाळके यांनी व्यक्त केला.

दरम्यान, स्वरूप वाळके यांच्या नियुक्तीचे युवासेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून स्वागत होत असून नव्या जबाबदारीनंतर जिल्ह्यात युवासेनेच्या संघटनेला अधिक आक्रमक आणि गतिमान स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!