
पारंपरिक वेशभूषेत नटले बालगोपाल; दहीहंडी फोडण्याचा विद्यार्थ्यांनी लुटला मनमुराद आनंद
देवगड : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी वाडा मुळबांध यांच्या संयुक्त विद्यमाने आज उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बालगोपालांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शालेय परिसर कृष्णमय झाला होता.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी केलेल्या पारंपरिक वेशभूषेचे. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत कृष्ण, राधा, गवळणी आदी विविध पात्रांच्या सुंदर वेशभूषा साकारल्या. रंगीबेरंगी वेशभूषेत नटलेले चिमुकले बालगोपाल पाहून शाळेच्या परिसरात जणू गोकुळ अवतरल्याचा आनंददायी अनुभव उपस्थितांना आला.
कार्यक्रमादरम्यान सौ. अपर्णा जोशी मॅडम व त्यांच्या सहकारी भगिनींच्या सहकार्याने श्रीकृष्णावर आधारित पारंपरिक गीतांचे सुंदर गायन करण्यात आले. ठेक्याच्या तालावर सादर झालेल्या या गीतांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. विद्यार्थ्यांनीही या गीतांवर उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.
यानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा मनमुराद आनंद घेतला. दहीहंडीच्या जयघोषाने आणि बालगोपालांच्या उत्साहाने शालेय परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी केवळ दहीहंडीच नव्हे, तर संपूर्ण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत जन्माष्टमीचा उत्सव आनंदाने साजरा केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. नवनाथ चौगले, अंगणवाडी सेविका सौ. अपर्णा जोशी, वाडा क्रमांक १ च्या अंगणवाडी सेविका सौ. केसरकर, अंगणवाडी मदतनीस श्रीमती रवीना जाधव, स्वयंपाकी मदतनीस सौ. लक्ष्मी जाधव काकी यांनी विशेष मेहनत घेतली.
तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शशांक तावडे, उपाध्यक्षा सौ. सिद्धी जाधव, शाळेचे सर्व पालक, हितचिंतक आणि ग्रामस्थ यांनी दिलेल्या सहकार्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सवांविषयी प्रेम निर्माण व्हावे, तसेच त्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा जन्माष्टमी सोहळा आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक एकतेचा सुंदर अनुभव देणारा ठरला.



Subscribe









