निपाणी: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी कित्तूरनजीक भरधाव कारची ट्रकला मागून धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चिकोडी येथील सहकार निबंधक कार्यालयातील द्वितीय दर्जा अधिकारी ठार झाला आहे.अमित नायकू शिंदे (वय 44, रा. अकोळ, ता. निपाणी) असे मृताचे नाव आहे. कारमधील आणखी तिघे जखमी झाले. जखमींवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महालिंग सदाशिव खुबी (30), सद्दाम हुसेन जमादार (32), नरसू विठ्ठल बन्ने (28, रा. तिघेही अकोळ) अशी जखमींची नावे आहेत. यातील सद्दाम जमादार यांची प्रकृती गंभीर आहे.
काय आहे सविस्तर वृत्त?
बंगळूरहून परतत असताना रविवारी सकाळी हा अपघात झाला. घटनेची नोंद कित्तूर पोलिसांंत झाली आहे. अमित शिंदे हे मित्र महालिंग खुबी, सद्दाम जमादार, नरसू बन्ने यांच्यासमवेत मुडबिद्रीला गेले होते. तेथून मूळगावी परतत होते. अमित शिंदे कार चालवत होते. त्यांची कार महामार्गावर कित्तूर नजीक आली असता गोकर्ण येथून बेळगावकडे निघालेल्या ट्रकला कारची मागून धडक बसली. यामध्ये अमितसह इतर तिघेजण गंभीर जखमी झाले. दरम्यान जखमींना तातडीने बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारासाठी नेत असताना अमित यांचा वाटेतच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच बैलहोंगलचे डीएसपी रवी नाईक, कित्तूरचे सीपीआय शिवानंद गुडनगट्टी, उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून जखमींना उपचारासाठी हलवले. अमित यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याबाबत ट्रक चालक शिवानंद याच्याविरोधात जखमी नरसू बन्ने यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ करत आहेत.













