पोलिसांच्या गाडीची दुचाकीला धडक

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

मालवण – कसाल मार्गावर सुकळवाड येथे अपघात

मालवण : मालवण – कसाल मार्गावरील सुकळवाड येथे पोलिसांच्या बोलेरो गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार जगदीश तुकाराम मांजरेकर (वय- ४५, रा. सुकळवाड भंडारवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडला. जगदीश हे आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते माध्यम असल्याने मांजरेकर कुटुंबाचा मुख्य आधार हरपला असून, सुकळवाड परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मालवण येथून कसालच्या दिशेने पोलिसांची चारचाकी (क्र. एम एच ०७ एएस ०९६१) जात होती. दरम्यान, सुकळवाड बाजारपेठ वरचानाका येथे समोरून येणाऱ्या दुचाकीला या पोलिसांच्या चारचाकीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार जगदीश मांजरेकर हे गंभीररित्या जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जगदीश यांना तातडीने उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून ‘मृत’ घोषित केले.

मृत जगदीश मांजरेकर हे सुकळवाड भंडारवाडी येथील स्थानिक रहिवासी होते. त्यांच्यामागे आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. जगदीश यांचे आई-वडील अत्यंत वयस्कर आहेत, तर भाऊ सतत आजारी असतो. अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी जगदीश यांच्यावरच होती. ते घरातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या या अकाली आणि अचानक जाण्याने मांजरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांचा जगण्याचा मुख्य आधार हिरावला गेला आहे.

अपघाताची बातमी सुकळवाड परिसरात वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांच्या गाडीकडूनच हा अपघात झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला असून पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.

error: Content is protected !!