बनाना राईड करताना महिला पर्यटकाचा मृत्यू!
मालवण : दांडी समुद्रात वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेताना एक मोठी दुर्घटना घडली आहे. बनाना राईड दरम्यान समुद्रात पडून मुंबईतील अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या शीतल शशिकांत मठकर (वय ४५) या पर्यटक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि पर्यटन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. शीतल मठकर या आपल्या पती, मुलगा, दीर आणि भावजय यांच्यासह एकूण नऊ जणांच्या कुटुंबासोबत शुक्रवारी मालवण-देवबाग येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. देवबागमधील एका कॉटेजमध्ये त्यांचा मुक्काम होता. दोन दिवस विविध पर्यटन स्थळांचा आनंद घेतल्यानंतर, शनिवारी त्यांनी आपल्या दिराचा वाढदिवसही साजरा केला होता. त्यानंतर रविवारी सकाळी सर्व कुटुंब दांडी किनारपट्टीवर वॉटरस्पोर्ट्ससाठी गेले होते. बनाना राईड करत असताना अचानक शीतल या समुद्राच्या पाण्यात पडल्या आणि त्यांची प्रकृती खालावली.
शीतल या पाण्यात पडल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. तिथे उपस्थित असलेल्या एका डॉक्टर पर्यटकाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना तातडीने मालवण येथील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे मठकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मालवण पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत


Subscribe










