अन्यथा १५ ऑगस्ट रोजी बांदा चेकपोस्ट येथे लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करण्यात येईल
समस्त डंपर व्यावसायिकांचा इशारा
सावंतवाडी : बांदा, सातार्डा व आरोंदा – लाठी परिसरातून होत असलेल्या अनधिकृत खडी व चिरे वाहतुक होत असून अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास तपासणी नाका सुरू करण्यात यावा. अशी मागणी समस्त डंपर व्यावसायिकांनी सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे. अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी बांदा चेकपोस्ट येथे लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, बांदा परिसरातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत खडी व्यवसाय व वाहतूक सुरू असल्याची बाब निदर्शनास येत आहे. तसेच सातार्डा परिसरातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत चिरे वाहतूक होत असून, आरोदा-लाठी परिसरातूनही अनधिकृतरीत्या चिरे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनधिकृत खडी व चिरे व्यवसायामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत असून शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. संबंधित ठिकाणी योग्य प्रकारे तपासणी व कारवाई होत नसल्यामुळे अशा प्रकारच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे बांदा, सातार्डा व आरोदा-लाठी या तिन्ही मार्गावर २४ तास तपासणी नाके सुरू करून वाहनांची नियमित तपासणी करण्यात यावी. अनधिकृत खडी व चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून शासनाचा महसूल सुरक्षित करण्यात यावा. या संदर्भात प्रशासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी, ही विनंती. अन्यथा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास, दिनांक १५ ऑगस्ट रोजी बांदा चेकपोस्ट येथे लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करण्यात येईल, याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी, आपण या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागांना आवश्यक आदेश द्यावेत. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून तातडीने दखल न घेतल्यास येत्या १५ ऑगस्ट रोजी बांदा चेकपोस्ट येथे लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


Subscribe










