कणकवली पटवर्धन चौकात दोन गटांत जोरदार मारामारी

भररस्त्यात तणाव, बघ्यांची गर्दी; शहरातील ‘सीसीटीव्ही’चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..

कणकवली : कणकवली शहरातील अत्यंत गजबजलेल्या मुख्य पटवर्धन चौकात बुधवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान मारामारी झाल्याची खळबळजनक घटना घडली. किरकोळ कारणावरून हा वाद उफाळून आल्याचे समजते. शहरालगतच्या गावातील दोन गट आमनेसामने आल्याने काही काळ चौकात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मारामारी सुरू झाल्याचे समजताच ही घटना पाहण्यासाठी नागरिकांनी चौकात मोठी गर्दी केली. त्यामुळे शहराच्या मुख्य रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही गटांना शांत करत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

घटनेची बातमी मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि चौकातील बघ्यांची गर्दी पांगवली. या प्रकरणी मारामारीचे नेमके कारण काय होते आणि यामध्ये कोण-कोण सहभागी होते, याबाबत पोलिसांकडून तपासाचे काम वेगाने सुरु आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पटवर्धन चौकासह शहरातील प्रमुख गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे. मुख्य चौकात सीसीटीव्ही व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असती, तर अशा घटनांवर वेळीच नियंत्रण ठेवणे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती समोर आणणे पोलिसांना अधिक सोपे गेले असते. दरम्यान, या मारामारीप्रकरणी पोलीस आता नेमकी काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!