सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर दुचाकी आणि कार यांच्यात भीषण अपघात

दुचाकीवरील युवक हवेत उडून कारवर आदळला

दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अत्यंत भीषण अपघातात मळेवाड येथील दोन तरुण गंभीर जखमी झालेत. हा अपघात आज दुपारच्या सुमारास घडला. अपघातातील गंभीर जखमींनवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील रपचारासाठी गोव्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या अपघातात पल्सर दुचाकी चालक यश नंदकिशोर नाईक (वय १९, रा. मळेवाड) आणि त्याचा साथीदार ओंकार आनंद कारिवडेकर (वय २२, रा. मळेवाड) हे दोघेही गंभीर जखमी झालेत. तर अल्टो कार चालक विराज विजय कुंभार (वय २८, रा. तळवडे) याला किरकोळ दुखापत झाली आहे. मळेवाड येथील दोन तरुण आपल्या पल्सर दुचाकीने मळेवाडच्या दिशेने जात होते. याच दरम्यान सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधून अल्टो कार मुख्य रस्त्यावर येत होती. रेल्वे स्टेशनच्या समोरच दोन्ही वाहनांची परस्परांना जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील ओंकार कारिवडेकर हा हवेत उडून कारच्या समोरील काचेवर आदळला आणि त्यानंतर कारच्या मागील बाजूला रस्त्यावर कोसळला. या धडकेत कारच्या समोरील काचेचा चक्काचूर झाला असून कारच्या दर्शनी भागाचे व दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघात घडताच सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या ‘१०२’ रुग्णवाहिकेने दोन्ही गंभीर जखमी तरुणांना तात्काळ उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोव्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. तर या अपघाताची नोंद सावंतवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सरदार पाटील आणि पोलीस हवालदार धोत्रे करीत आहेत.

error: Content is protected !!