गाडीचा वेग अचानक वाढल्याची चर्चा
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर झाराप-जांभळी येथे आज रात्री साडेनऊच्या सुमारास Mahindra EV या नवीन इलेक्ट्रिक गाडीचा वेग अचानक वाढल्याने भीषण अपघात घडला. सुदैवाने या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विशेष म्हणजे आजच गाडीला अधिकृत नंबर मिळाला होता. ओरोस येथून घरी परतत असताना झाराप येथे आल्यानंतर अचानक गाडीचा स्पीड प्रचंड वाढला. गाडी तब्बल १०७ च्या वेगावर गेल्याने वाहनचालकाला वाहनावरील नियंत्रण मिळवता आले नाही.
भरधाव वेगातील ही इलेक्ट्रिक कार थेट रस्त्यालगतच्या एका गॅरेजमध्ये घुसली. धडकेचा आवाज एवढा भीषण होता की महामार्गालगतच्या घरांपर्यंत तो पोहोचला. जोरदार ब्रेकचा आवाज आणि धडकेने परिसर हादरून गेला. आवाज ऐकताच नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर धावून आले.
या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेल्या अनेक वाहनांना मागून जोरदार धडक बसल्याने काही गाड्या अक्षरशः रस्त्यावर फेकल्या गेल्या. अपघातानंतर काही काळ महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. Mahindra EV या इलेक्ट्रिक गाडीचा वेग अचानक वाढल्याची चर्चा घटनास्थळी जोरात सुरू होती. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


Subscribe










