तरुणाचा जागीच मुत्यू
कणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेतील रहिवासी आणि व्यावसायिक राजेश (राजा) पेडणेकर यांचे सुपुत्र मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर (वय २८) यांचा कानडेवाडी नजीक झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (१२ ऑगस्ट २०२६) रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास घडला. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे फोंडाघाट आणि परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
अपघाताबाबत अधिक माहिती अशी की,
डामरे (करूळ) कानडेवाडी स्टॉपजवळ.
बुधवारी रात्री ९:४५ वाजता मैत्रेय पेडणेकर हे आपल्या ताब्यातील ब्रिझा कारने कणकवलीवरून फोंडाघाटच्या दिशेने येत होते. दरम्यान, डामरे कानडेवाडी स्टॉपजवळ आल्यावर अचानक चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन बाजूच्या मातीच्या ढिगाऱ्यावर जोरदार आपटली.
या भीषण धडकेत मैत्रेय यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील, हवालदार विनोद चव्हाण व अन्य पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.
एक तरुण, होतकरू आणि मनमिळाऊ मुलाच्या अकाली निधनामुळे पेडणेकर कुटुंबावर आघात झाला असून, फोंडाघाट बाजारपेठेत हळहळ व्यक्त होत आहे.


Subscribe










