अनेक वर्षे रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम सध्या कासव गतीने चालू आहे. या दरम्यान या महामार्गावर अनेक लहान मोठे अपघात होऊन त्यामध्ये काही जण गंभीर जखमी तर काही जणांना आपला प्राण गमवाला लागला आहे. असेच ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शुक्रवार 24 जानेवारी रोजी रात्री नागोठणे शहाराजवळ अरुंद व खराब खड्डे युक्त रस्त्यामुळे या महामार्गावर रोहा तालुक्यातील वणी येथील शाखाप्रमुख तसेच स्थानिक शिक्षण समितीचे माजी सभापती अजय नथुराम मांडलुसकर वय 54 वर्षे यांना आपला नाहक जीव गमवावा लागला. या अपघातानंतर मांडलुसकर यांना न्याय मिळण्यासाठी वणी गाव व नागोठणे विभागातील नागरिकांनी रस्ता रोको करीत अजून किती निष्पाप जणांचा प्राण घेणार असा सवाल उपस्थित केला आहे.
अजय मांडलुसकर हे काही कामानिमित्त शुक्रवार 24 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या अॅक्टीवा MH 06/CR 5529 घेऊन काही कामानिमित्त मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबई बाजूकडुन नागोठणे बाजूकडे जात असता ते नागोठणे शहराच्या हद्दीतील रामनगर येथे आले असता एक पदरी अरुंद व खराब रस्त्यावरील खड्यामधून त्यांची गाडी जात असता समोरून अति वेगात खराब रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचे जागीच निधन झाले. याची वार्ता वणी गाव तसेच नागोठणे शहर व परिसरात समजताच नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. तसेच अजय मांडलुसकर यांना न्याय मिळण्यासाठी नागरिकांनी अजून किती निष्पाप जणांचा प्राण घेणार? असा सवाल उपस्थित करीत रस्ता रोको करीत आपला निषेध नोंदविला.
यावेळी रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र दौंडकर व नागोठणे पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित न करता परिस्थित व्यवस्थित हाताळून महामार्ग मोकळा केला. या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहा.पो.नि. सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. गोटीराम पावरा करीत आहेत.













