
रिक्षेचे मोठे नुकसान, चालक-प्रवासी थोडक्यात बचावले
केतन शिरोडकर /पिंगुळी – पिंगुळी ते वेंगुर्ला मार्गावर प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षेला अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याने जोरदार धडक दिल्याची घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वेतोरे हायस्कूलच्या पुढील पालकरवाडी दरम्यान घडली. या अपघातात रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षाचालकासह प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा क्रमांक MH 07 AH 0053 मधून रिक्षाचालक प्रवाशांना घेऊन पिंगुळीहून वेंगुर्ल्याच्या दिशेने जात होते. पालकरवाडी परिसरात अचानक एक गवा रस्त्यावर आल्याने रिक्षेला त्याची जोरदार धडक बसली. धडकेमुळे रिक्षेचे मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच पिंगुळी गोंधळपूरचे पोलीस पाटील शंकर सातर्डेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करत रिक्षाचालक व प्रवाशांची विचारपूस केली. परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी मोठी गर्दी करत जखमी रिक्षाचालक व प्रवाशांना मदत केली.
या घटनेची माहिती मिळताच पिंगुळी तलाठी जितेंद्र खताडे साहेबांनी विशेष सहकार्य केले. तसेच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेचा पंचनामा केला.
दरम्यान, दिवसाढवळ्या गवे मानवी वस्तीत तसेच रस्त्यांवर वावरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि नाराजी व्यक्त होत आहे. गव्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाच आता भरदिवसा रस्त्यांवर त्यांचा वावर वाढल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सध्या गणपती उत्सवाचा काळ सुरू असून रिक्षा व्यावसायिकांसाठी हा प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ आहे. अशातच रिक्षेचे मोठे नुकसान झाल्याने संबंधित रिक्षा व्यावसायिकासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अपघातानंतर रिक्षा व्यावसायिक काही क्षण भावूक झाले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांना धीर देत सावरण्याचा प्रयत्न केला.
वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त रिक्षा व्यावसायिकाला योग्य ती मदत मिळवून द्यावी, तसेच मानवी वस्तीत व रस्त्यांवर वावरणाऱ्या गव्यांपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



Subscribe










