कुडाळ रेल्वे स्थानक परिसरातील घटना
कुडाळ : कुडाळ रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या दुर्घटनेत तुतारी एक्स्प्रेसची धडक बसून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रघुवीर छोटूलाल भिल (रा. बारा, राजस्थान) असे मृताचे नाव आहे. रेल्वे मार्गावर त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने जात असताना दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वेची धडक बसल्याने रघुवीर भिल यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
सुरुवातीला मृताची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी घटनास्थळी तसेच मृतदेहाजवळील वस्तूंची पाहणी केली. यावेळी एका पिशवीत केरळ स्टेट हेल्थ सर्व्हिस मेंटल हेल्थ सेंटर फिसूर या संस्थेची पुस्तिका पोलिसांच्या हाती लागली. त्यावर ‘रघुवीर महावीर भिल’ असे नाव नमूद होते. तसेच पुस्तिकेच्या आतील बाजूस ‘लोकेश ब्रदर’ या उल्लेखासह एक मोबाईल क्रमांक लिहिलेला होता.
या क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर तो क्रमांक रघुवीर भिल यांच्या भावाचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृतदेहाचा फोटो संबंधित व्यक्तीला पाठवला. फोटो पाहिल्यानंतर त्याने मृत व्यक्ती आपला भाऊ रघुवीर भिल असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांकडून मृताची ओळख निश्चित करण्यात आली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात रघुवीर भिल हे मागील सात ते आठ महिन्यांपासून मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. ते कुडाळ रेल्वे स्थानक परिसरात कोणत्या कारणाने आले होते आणि रेल्वेची धडक नेमकी कशामुळे बसली, याचा तपास कुडाळ पोलीस करत आहेत.
या प्रकरणी तन्मय अविनाश कदम (रा. चिपळूण) यांनी पोलिसांना खबर दिली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.


Subscribe










