मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे अपघात

कार रेलिंग तोडून दुचाकीवर कोसळली

कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर कसाल हद्दीत आज (मंगळवारी) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मारुती सुझुकी स्विफ्ट कार रस्त्याच्या बाजूच्या रेलिंगला धडकली. धडकेनंतर रेलिंगसह कार सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीवरील दोघांसह कारमधील दोघे अशा चौघांना गंभीर दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, KA-22-7361 क्रमांकाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार कसालच्या दिशेने जात असताना चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यानंतर कार महामार्गाच्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगला जोरदार धडकली. या धडकेत रेलिंग तुटून कारसह सर्व्हिस रोडच्या दिशेने कोसळले. याचवेळी MH-07-AP-5088 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या अंगावर कार व रेलिंग पडल्याने अपघात झाला.

या अपघातात दुचाकी चालक इंद्रजीत सखाराम बोडेकर (वय २३) आणि त्यांच्या सोबत असलेल्या पुष्पा तुकाराम बोडेकर (वय ५०), दोघेही रा. ओरोस, रवळनाथ नगर, ता. कुडाळ, तसेच स्विफ्ट कार चालक परशुराम लालप्पा लमाणी (वय २७) आणि कारमधील श्रुती परशुराम लमाणी (वय २६), दोघेही रा. बागलकोट, कर्नाटक, हे जखमी झाले.

अपघाताची माहिती पोलिसांना दुपारी ३.०५ वाजता मिळाली. माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदतकेंद्र कसाल येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक फाले, हेड कॉन्स्टेबल महाडिक, पोलीस नाईक ढोले आणि पोलीस कॉन्स्टेबल साबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली.

या अपघातामुळे काही काळ महामार्ग परिसरात खळबळ उडाली होती. वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे. अपघाताबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

या अपघाताचा अधिक तपास महामार्ग पोलीस मदत केंद्र, कणकवली-कसाल येथील अधिकारी करीत आहेत.

error: Content is protected !!