कणकवली नांदगाव ऑटोफाटा येथे कारचा भीषण अपघात

एकाचा मृत्यू, चौघे जखमी

कणकवली : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांची वर्दळ वाढलेली असतानाच कणकवली तालुक्यातील नांदगाव ऑटोफाटा येथे रविवारी सकाळी कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-बदलापूर येथून आचरा-अडवली, मालवणच्या दिशेने कारमधून पाच जण प्रवास करत होते. रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास कार नांदगाव ऑटोफाटा परिसरात पोहोचली. यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली.

या अपघातात आनंद दादू लाड (वय अंदाजे ७०, रा. नालासोपारा, मुंबई) यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारमधील अन्य चार प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आणि गणेशभक्त सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवत सुरक्षितपणे प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कणकवली पोलिसांनी तपास सुरू केला असून, दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

error: Content is protected !!