माणगाव येथील दोघांना गंभीर दुखापत
आंबोली : आंबोली नांगरतास परिसरात आज सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांना दुखापत झाली असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मायकल डिसूजा यांच्या फार्महाऊसनजीक हा अपघात घडला. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या MH-10-AW-7943 क्रमांकाच्या ट्रकने MH-04-HM-0217 क्रमांकाच्या व्हॅगनार कारला जोरदार धडक दिली.
या अपघातात केशव दत्ताराम केसरकर (वय 27) हे जखमी झाले असून संतोष रामचंद्र धुरी (वय 32) यांना गंभीर दुखापत झाली आहे. दोघेही माणगाव-कट्टावाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे आणि लक्ष्मण काळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीचीही कोंडी झाली होती. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे किती धोकादायक ठरू शकते, याची जाणीव करून देणारा हा अपघात ठरला आहे. घटनेचा पुढील तपास आंबोली पोलीस करीत आहेत.


Subscribe










