गणेशोत्सवासाठी आंबेरी येथे आलेला इसम बुडाला

कर्ली नदीत होडी उलटल्याने घडली दुर्घटना

मालवण : गणेशोत्सवासाठी आंबेरी-वाकवाडी येथील सासरवाडीला आलेल्या मुंबईतील दर्शन चंद्रकांत टकारिया (मूळ रा. गुजरात) यांचा कर्ली नदीत होडी उलटून झालेल्या दुर्घटनेनंतर शोध सुरू होता. अखेर दुर्घटनास्थळापासून सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला.

गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजता टकारिया कुटुंबीय छोट्या होडीतून नदीपलीकडील जुवा येथे शेतीच्या कामासाठी जात असताना ही घटना घडली. नदीपात्रातून प्रवास सुरू असताना अचानक होडीचा तोल गेल्याने ती उलटली आणि त्यातील चौघेही पाण्यात पडले.

होडीचालक स्वप्नील संदीप वाक्कर यांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदतकार्य केले. त्यांनी श्वेता टकारिया आणि प्रणल वाक्कर यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मात्र दर्शन टकारिया हे नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याने त्यांचा शोध घेण्यात येत होता.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत, पोलीस, महसूल विभाग, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त मदतीने नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर शोधमोहीमेदरम्यान दर्शन टकारिया यांचा मृतदेह आढळून आला.

error: Content is protected !!