मालवण देवली पुलाजवळ भीषण अपघात

दोन बालकांचा मृत्यू, एक गंभीर

मालवण : मालवण तालुक्यातील देवली पुलाजवळ मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोवा येथील बांबुळी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेने देवली परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवलीहून कुंभारमाठच्या दिशेने प्रवास सुरू असताना रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत ओंकार भावा निकम (१२) आणि राजू अर्जुन निकम (१०) यांचा मृत्यू झाला. तर सचिन अंकुश निकम हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी गोवा येथील बांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. प्रो. डीवायएसपी शेलार, एपीआय गणेश माने, एपीआय पंडित पाटील, पीएसआय भगत, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर आणि कॉन्स्टेबल पाटील यांनी घटनास्थळी आवश्यक कार्यवाही केली.

दरम्यान, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, मालवण पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!