मालवण : गौरी-गणपतीच्या सणासाठी मुंबईहून गावी आलेल्या १८ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मालवण तालुक्यातील हिवाळे धुरीवाडी येथील देवकोंड परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. यश अनंत धुरी असे मृत तरुणाचे नाव आहे.
यश हा नालासोपारा, मुंबई येथे राहत होता. गुरुवारी वडिलांसोबत तो गणेशोत्सवासाठी गावी आला होता. रात्री त्याने वाडीतील भजनातही सहभाग घेतला. शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तो एका मित्रासोबत गडनदीपात्रातील देवकोंड परिसरात पोहण्यासाठी गेला होता.
दोघे नदीत पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने यश पाण्यात बुडाला. मित्राने काही वेळ नदीपात्रात त्याचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. त्यानंतर त्याने ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच ग्रामस्थ आणि वाडीतील तरुणांनी नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. हिवाळेचे पोलिसपाटील वीरेंद्र कदम यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर आचरा पोलीस ठाण्याचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. जवळपास दोन तासांच्या शोधानंतर नदीतील गाळात रुतलेल्या अवस्थेत यशचा मृतदेह सापडला.
यशने आंबोली सैनिक स्कूलमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. देशसेवेची इच्छा असलेल्या यशने नुकतीच नौदल आणि अग्निवीर भरतीची परीक्षा दिली होती. मात्र, अवघ्या १८व्या वर्षी त्याचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने हिवाळे गावावरही शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी आचरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. यशच्या मृतदेहावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Subscribe










