दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापात
ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून अचानक एसटी बस आल्याने घडला अपघात
कुडाळ : पिंगुळी – पाट मार्गावर माड्याचीवाडी -करमळगाळू जवळ ट्रकला ओव्हरटेक मारताना समोरून अचानक एसटी बस आल्याने तिला बाजू देण्याच्या प्रयत्नात दुचाकी ट्रकला आदळून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना रविवारी सायं. ५ वाजताच्या सुमारास घडली. जखमीला तातडीने कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पिंगुळीहून पाटच्या दिशेने मालवाहू ट्रक जात होता. त्या मागे रिक्षा आणि रिक्षाच्या मागून दुचाकी शेळपीच्या दिशेने जात होती. त्याचवेळेस रिक्षा ट्रकला ओव्हरटेक करून पुढे गेली, त्यामागे असलेली दुचाकीस्वारानेही ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळेस समोरून श्रीरामवाडीहून कुडाळच्या दिशेने एसटी बस येत होती.
एसटी बस समोर आल्याने ओव्हरटेक करणा-या दुचाकीस्वाराने दुचाकी डाव्या बाजूला घेताना दुचाकी ट्रकला मागावून आदळली. त्यानंतर दुचाकीस्वार दुचाकीसह वाहनांच्या टायरजवळ गेला. यात दुचाकीस्वाराच्या पायाला दुखापत झाली असून तातडीने कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहीती मिळताच कुडाळ आणि निवती पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली. कुडाळ आगार प्रमुख रोहीत नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली.


Subscribe










