मुंबई-गोवा महामार्गावर हुमरमळा येथे एकाच दिवशी दोन अपघात

दुचाकीस्वार युवक जखमी

तर दुसऱ्या अपघातात कारचा टायर फुटला

कुडाळ : तालुक्यातील वाडी हुमरमळा येथे मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी दुपारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडले. कासले दुकान आणि राणे दुकान बसस्टॉप परिसरात झालेल्या या अपघातांमध्ये एका दुचाकीस्वारास दुखापत झाली असून सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कासले दुकान बसस्टॉपजवळ कुडाळहून ओरोसच्या दिशेने एक दुचाकी आणि एक ओमनी कार जात होती. त्याचवेळी तेथील मिडलकटमधून दुसरी कार वळत होती. दरम्यान, दुचाकीस्वार अचानक मिडलकटच्या दिशेने वळल्याने ओमनी कारची दुचाकीला धडक बसली. या धडकेनंतर ओमनी कार दुचाकीवरून पुढे जात दुसऱ्या कारलाही धडकली. या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार युवक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, दुसरा अपघात राणे दुकान बसस्टॉपजवळ घडला. ओरोसहून कुडाळच्या दिशेने येणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार प्रथम डिव्हायडरवर आदळली आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या लेनवर जाऊन पलटी झाली. अपघाताची तीव्रता एवढी होती की धडकेनंतर कारचा टायरही फुटला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली. दोन्ही अपघातांनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचूनपुढील कार्यवाही सुरू केली आहे.

error: Content is protected !!