शाळकरी मुलगा जागीच ठार…
अन्य दोघे गंभीर जखमी;
संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प…
कुडाळ : सरस्वती पूजन करून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांच्या दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात एक मुलगा जागीच ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी तीन वाजता झाराप फाटा येथे घडली. राज पेडणेकर असे मृत मुलाचे नाव आहे. तर त्याच्यासमवेत सोहम परब, लवू रविंद्र पेडणेकर (रा. साळगाव नाईकवाडी ) हे दोघे जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. जोपर्यंत कार चालकावर कारवाई केली जात नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
हे तिन्ही विद्यार्थी साळगाव हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिकणारे होते. सरस्वती पूजनाच्या दिवशी सरस्वती पूजन करून तिघेही दुचाकी वरून झाराप तिठा क्रॉस करत असताना मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना उडवले. या अपघातात राज पेडणेकर याचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर परिसरातील संतप्त नागरिक तात्काळ घटनास्थळी जमा झाले. या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मृतदेह महामार्गावर ठेवत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले असले तरी संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरल्याने तणावाचे वातावरण आहे
















 
	

 Subscribe
Subscribe









