कणकवली येथे किरकोळ कारणातून युवकावर कटर व ब्लेडने वार…

एका महिलेसह १३ जणांवर गुन्हे

कणकवली : मोटरसायकल अडवून शिवीगाळ का केली याची विचारणा केल्याच्या रागातून भावेश बाळकृष्ण रजपूत (वय २१, रा. कलमठ गोसावीवाडी) याच्या छातीवर, पाठीवर आणि दंडावर कटर ब्लेडने वार करून दुखापत केल्याच्या गुन्ह्यात आकाश शिवाजी निकम (रा. नाथ पै नगर कणकवली), ओंकार किंजवडेकर, हेमंत भोगले (दोघे रा. हरकुळ बुद्रुक) यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ मे रोजी रात्री ११ वाजता घडली.

फिर्यादी भावेश याचा मित्र हिमांशु परब याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भावेश चे मित्र साहिल आणि आर्यन हे केक आणण्यासाठी कणकवली बाजारपेठेत गेले होते. त्यावेळी साहिल आणि आर्यन यांची मोटरसायकल अडवून आरोपी आकाश निकम, ओंकार किंजवडेकर, हेमंत भोगले यांनी शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी आरोपी बसलेल्या ठिकाणी नाथ पै नगर येथील मोकळ्या जागे ठिकाणी भावेश आणि सहकारी गेले असता वरील आरोपींनी भावेशच्या छातीवर, पाठीवर आणि दंडावर कटर ब्लेडने वार केले.

यामध्ये जखमी झालेल्या जखमी भावेश याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींवर बी एन एस ११५, ११८, ३५२,३५१ (३),१२६(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कटर ब्लेडने वार झाल्यानंतर जखमी युवकाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याची घटना समजताच गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात गेलेले पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनाच धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी श्वेता संदीप परब या महिलेसह अन्य १३ जणांविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना ३ मे रोजी रात्री ११:४५ वा. ते ४ मे रोजी मध्यरात्री १२:४५ वा. च्या सुमारास घडली.

भावेश रजपूत याच्यावर कटर ब्लेडने वार केल्याची घटना समजताच कणकवली पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. त्यावेळी सुमारे ५० पेक्षा जास्त लोकांचा जमाव उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात होता. आरोपींना आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत हा जमाव उग्र झाला होता. त्यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र पोलिसांच्या आवाहनाला न जुमानता आरोपींनी पोलिसांच्या कामात अटकाव करत पोलिसांच्या अंगावर धावून जात “बाहेर पड तुला दाखवतो” अशी ऑन ड्युटी पोलिसांना धमकी दिली.

कॉन्स्टेबल सचिन माने यांच्या फिर्यादीवरून आरोपी श्वेता परब, नमिता गावडे, हिमांशु संदीप परब, आर्यन सावंत, साहिल सावंत, वैभव मालंडकर, रोहित जाधव, मिनार रजपूत, सूरज राणे, विनीत रजपूत, यश पाटील, मयुर धुमाळे, नवराज झेमने, प्रणय शिर्के, लवू कलकुटकी यांसह १३ जणांवर बी एन एस १९४ (२), १९४, १८९, ३५१ ( २ ), १३१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!