
राणे कुटुंबीयांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून विकासकाम; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांना मोठा दिलासा
कुडाळ : कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नव्याने बसविण्यात आलेल्या सुशोभित पथदिव्यांचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या पथदिव्यांचा शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर आजपासून हे सुशोभित पथदिवे नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहेत.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. नारायण राणे साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब आणि कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून कुडाळ नगरपंचायतीमार्फत हिंदू कॉलनी परिसरात हे सुशोभित पथदिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्याने परिसराला आता आकर्षक आणि प्रकाशमय स्वरूप प्राप्त झाले आहे.
हिंदू कॉलनी हा कुडाळ शहरातील महत्त्वाचा निवासी परिसर असून, नव्या पथदिव्यांमुळे रात्रीच्या वेळी परिसरातील प्रकाशव्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना ये-जा करताना अधिक सुरक्षितता मिळणार असून परिसराच्या सौंदर्यातही लक्षणीय भर पडणार आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे पथदिवे सुरू झाल्याने हिंदू कॉलनीतील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या शुभारंभप्रसंगी कुडाळ नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, हिंदू कॉलनी अध्यक्ष अशोक मालवणकर काका, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नारकर, शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे, उद्योजक रत्नाकर प्रभूतेंडोलकर, प्रताप खामकर काका, गौरव राजाध्यक्ष, दर्शन सावंत, सौ. अक्षता कुडाळकर, सौ. रेवती राणे, शिवसेना शाखाप्रमुख बाळा कुडाळकर, शिवसेना बी.एल.ए. समन्वयक राजवीर पाटील, बाळा सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, हिंदू कॉलनीतील रहिवासी व नागरिक उपस्थित होते.
शहरातील नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच शहराचे सुशोभीकरण आणि विकासाला गती देण्याच्या दृष्टीने अशा विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात परिसर प्रकाशमान झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, या विकासकामाबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



Subscribe










