एखाद्या नेत्याचा किंवा मुख्यमंत्र्यांचा दरारा काय असतो हे नारायण राणेंच्या रुपात पाहिलं असे उद्गार उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काढले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वरळी येथे आजी – माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मला राणे साहेबांसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही कारण, त्यावेळी मी विरोधी पक्षात होतो. एखाद्या नेत्याचा किंवा मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो हे राणे साहेबांकडे बघून पाहिलं. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राणे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचा दरारा पक्षाच्या सर्व सदस्यांवर होता. विधिमंडळात त्यांनी मागे वळून पाहिलं की अख्खं सभागृह शांत व्हायचं अशा शब्दात त्यांनी खा. नारायण राणे यांचे कौतुक केले. असा दरारा मी कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत पाहिला नाही असे ते यावेळी म्हणाले.
नेहमी एकमेकांवर टीका करण्याची संधी न सोडणारे महाराष्ट्राचे नेते एकमेकांचे मुक्तकंठाने कौतुक करताना पाहायला मिळाले. ऐन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या या आगळ्यावेगळ्या संस्कृतीचे दर्शन सर्वांना झाले.