पिंगुळीत ज्येष्ठांचा सन्मान अन् गुणवंतांचा गौरव;

ग्रामस्थ हितवर्धक संघाचा गुणगौरव सोहळा उत्साहात.

केतन शिरोडकर /पिंगुळी : पिंगुळी ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबई यांच्या विद्यमाने पिंगुळी गावातील ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थी, निवृत्त शिक्षक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव व सत्कार सोहळा बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी संत राऊळ महाराज मठ, पिंगुळी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

गावाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान करण्यासोबतच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कर्तृत्वाला योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ८२ ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच दहावी (SSC) व बारावी (HSC) परीक्षेत ६० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

निवृत्त शिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार का.आ. सामंत सर यांच्या वतीने करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात अनेक पिढ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर, पिंगुळी ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत बु. धुरी, सरचिटणीस बाळा पिंगुळकर, कार्याध्यक्ष काशिनाथ निकम,का. आ.सामंत सर, उद्योजक प्रदीप माने, मिलिंद पाटील, मनसे जिल्हाप्रमुख धीरज परब, राघोजी परब आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि निवृत्त शिक्षकांचा सत्कार हा समाजातील विविध पिढ्यांना जोडणारा उपक्रम असल्याचे मान्यवरांनी सांगितले. पिंगुळी ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबईच्या या सामाजिक उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.
का.आ.सामंत सर यांनी आपल्या मनोगतात पिंगुळी ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सर्वप्रथम आभार मानले. शिक्षण व कामानिमित्त गावाबाहेर गेलेल्या व्यक्तींनी आपल्या गावाशी असलेले नाते कायम जपणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. गावासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या ज्येष्ठ मंडळींचा सन्मान करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आपल्या शैक्षणिक व सामाजिक प्रवासातील आठवणी सांगताना पिंगुळी प्राथमिक शाळेतील शिक्षण, कुडाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांशी असलेला ऋणानुबंध तसेच पिंगुळीचे पहिले तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याचाही त्यांनी उल्लेख केला. संघाच्या अशा चांगल्या उपक्रमांना सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.

मिलिंद पाटील यांनी आपल्या मनोगतात बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि मोबाईलच्या वाढत्या वापराचा उल्लेख केला. आजच्या काळात मोबाईल हे माहितीचे प्रभावी माध्यम बनले आहे. आगामी काळात तंत्रज्ञानात आणखी मोठे बदल होणार असून, विद्यार्थ्यांची आवड व क्षमता लक्षात घेऊन त्यांना योग्य शिक्षणाच्या क्षेत्राची दिशा देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि नव्या पिढीतील विद्यार्थ्यांचे कर्तृत्व यांचा संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमातून “ज्येष्ठांचा सन्मान आणि गुणवंतांना प्रोत्साहन” असा सामाजिक संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे समालोचन बाळा पिंगुळकर यांनी केले, तर घनशाम पाताडे यांनी आभार मानले. विष्णु धुरी सह ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत हा गुणगौरव व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.

error: Content is protected !!