
हुंबरट येथे थरार
कणकवली : राजापूरहून गोव्याच्या दिशेने तीन प्रवाशांना घेऊन निघालेल्या कारचालकावर प्रवाशांनीच चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील हुंबरट येथे घडली. रविवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास महामार्गावर हा प्रकार घडला. कारचालकाने आरडाओरड केल्यानंतर तिन्ही संशयित घटनास्थळावरून पसार झाले.
या हल्ल्यात रेहान इकबाल सय्यद (वय ३२, रा. वाघुवाडा, राजापूर) हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री राजापूर बसस्थानक परिसरात गोव्याला जाण्यासाठी तीन प्रवासी उपलब्ध असल्याची माहिती रेहान सय्यद यांना त्यांच्या चुलत भावाकडून मिळाली. त्यानंतर रेहान यांनी संबंधित प्रवाशांशी संपर्क साधून राजापूर ते गोवा प्रवासासाठी ४ हजार रुपयांत भाडे निश्चित केले. तिन्ही प्रवाशांना कारमध्ये घेऊन ते गोव्याच्या दिशेने रवाना झाले.
हुंबरट परिसरात पोहोचल्यानंतर प्रवाशांनी लघुशंकेसाठी कार थांबविण्यास सांगितले. कार थांबल्यानंतर काही वेळातच एका प्रवाशाने वाहनाची चावी मागितली. चावी देण्यास रेहान यांनी नकार दिल्यानंतर त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला.
मागील सीटवर बसलेल्या एका प्रवाशाने रेहान यांचा गळा पकडला, तर दुसऱ्या प्रवाशाने चाकूने त्यांच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला. रेहान यांनी प्रसंगावधान राखत बाजूला झाल्याने छातीवरील वार टळला. त्यानंतर ते कारमधून बाहेर पडले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत दोन्ही पायांवर चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत रेहान यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर तिन्ही हल्लेखोर तेथून पळून गेले.
दरम्यान, नांदगाव-कणकवली मार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास रेहान रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले आले. त्यांनी तातडीने कणकवली पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव, एपीआय गणेश पवार, पीएसआय प्रितेश पाटील यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी रेहान यांना प्रथम कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
हल्ल्यात वापरलेली कार पोलिसांनी कणकवली पोलिस ठाण्यात आणली असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार करत आहेत.



Subscribe










