रुग्णसेवेचा ‘ अरुणोदय’

संकलन : चिन्मय घोगळे

डॉक्टर म्हणजे जणू परमेश्वराचे दुसरे रूप. ‘ रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा’ मानून हे डॉक्टर आपलं आयुष्य वेचतात. प्रसंगी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून समाजासाठी स्वतःला वाहून घेतात. यामध्ये एक नाव मात्र अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ते म्हणजे डॉ. अरुण गोडकर यांचे.

डॉ. अरुण गोडकर यांचा जन्म १७ मे १९६४ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला तालुक्यातील आरवली (टाक) येथील त्यांच्या मूळ गावी झाले. परंतु त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक असल्यामुळे त्यांच्या नेहमी बदल्या होत असत. त्यामुळे ‘ विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या म्हणीप्रमाणे सर्व कुटुंबाला स्थलांतरीत व्हावे लागत असे. वडीलांच्या होणाऱ्या सततच्या बदल्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये डॉ. अरुण गोडकर यांचे शिक्षण झाले आहे. वडील शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे शिक्षणाचे ‘ बाळकडू ‘ त्यांना सुरवातीपासूनच मिळाले. त्यांच्यातील जिद्द, चिकाटी आणि घरातूनच मिळालेले शिक्षणाचे बाळकडू या सगळ्याचे फलित म्हणून १९९० साली वेंगुर्ला होमिओपॅथी कॉलेजमधून डी.एच.एम.एस. ही पदवी संपादन करत ते कुटुंबातील पाहिले डॉक्टर बनले.

२७ मे १९९४ साली पणदूर येथे स्वतः चा दवाखाना सुरू करत त्यांनी आपले कार्यक्षेत्र निवडले. आणि पणदूर पंचक्रोशीत जणू रुग्णसेवेचा ‘ अरुणोदय’ झाला. त्याकाळी रस्ते आणि वाहनांची गैरसोय असताना देखील घरोघरी जाऊन आपले रुग्णसेवेचे कर्तव्य बजावले. पावसाळ्यात अणाव सारख्या गावामध्ये नदीला पूर येत असे अशा वेळी नदीच्या पुरातून वाट काढत देखील त्यांनी रुग्णांची सेवा बजावली आहे. अशावेळी त्यांना पाहताच ते गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेल्या देवदूताप्रमाणे भासत. प्रसंगी गरीब रुग्णांकडून पैसे न आकारता त्यांनी रुग्णांना मोफत सेवा दिली आहे. म्हणूनच पणदूर पंचक्रोशीत ‘ गरिबांचा डॉक्टर’ अशी त्यांची ओळख आहे.

या डॉक्टररुपी ‘ अरुणाचे’ प्रखर तेज पाहून स्वर्गीय शशिकांत अणावकर सरांनी वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक पदी त्यांची निवड केली. डॉ. गोडकर यांनी देखील अणावकर सरांना आपले गुरू मानून शिक्षण क्षेत्रात देखील आपले कार्य जोमाने सुरू ठेवले. या तेजोमय ‘अरुणा’ मुळे स्वर्गीय अणावकर सरांची शिक्षण नगरी उजळून निघाली. आज पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाचे सेक्रेटरी म्हणून ते कार्यरत आहेत. आपले गुरू अर्थात शशिकांत अणावकर सरांनी दिलेला ज्ञानरूपी वसा ते पुढे घेऊन जात आहेत.

आपली समाजसेवेची आवड जपण्यासाठी त्यांनी २०१२ साली राजकारणात आपले पाऊल टाकले. त्यांच्यातील समाजसेवा, समर्पण आणि अभ्यास हे गुण पाहून पणदूर ग्रामस्थांनी त्यांना संधी दिली. या कालावधीत त्यांनी सरपंच व उपसरपंच पद देखील भूषवले आहे. आपल्या आजवरच्या आयुष्यात या ‘ अरुणा’ने सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश टाकला आहे. आपल्या ‘ गोडकर’ या आडनावाप्रमाणेच ते सर्वांचे आयुष्य गोड करत आहेत. त्यांच्या भावी वाटचालीस सिंधू दर्पण डिजिटल न्युज चॅनेलकडून खूप खूप शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *