नोकरी गमावल्याच्या नैराश्यातून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या;

कणकवली येथे दुर्दैवी घटना

कणकवली: नोकरी गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातून कणकवली तालुक्यातील एका ५२ वर्षीय सुरक्षा रक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अविनाश नारायण गिरकर (वय ५२, रा. पियाळी, ता. कणकवली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश गिरकर हे मुंबई येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. मात्र, त्यांची नोकरी गेल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होते. या तणावातून बाहेर न पडता, त्यांनी अखेर नैराश्याने ग्रासून हे टोकाचे पाऊल उचलले.

रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गिरकर यांनी नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ अविनाश यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी पहाटे ४:४५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेची माहिती समीर नारायण तेली यांनी कणकवली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू केली आहे.

नोकरी गमावल्यामुळे आलेल्या आर्थिक आणि मानसिक ताणामुळे एका व्यक्तीने आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!